नाशिक : विधानसभा निवडणूक काळात कॉँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधी काम आणि पक्षविरोधी कारवाया करणारे सिन्नरचे माजी नगरसेवक इलियास खतीब, निफाड तालुका कॉँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश दाते आणि चांदवड येथील सुरेश गुंजाळ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी दिली आहे. कॉँग्रेसचे प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या सूचनेवरून प्रदेश सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने सदर कारवाई करण्यात आल्याची माहिती पानगव्हाणे यांनी दिली. विधानसभा निवडणुकीत जिल्'ातील सिन्नर मतदारसंघातील कॉँग्रेस पक्षाचे उमेदवार संपतराव काळे, निफाड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेंद्र मोगल तसेच शंकरराव गांगुर्डे आणि चांदवड तालुका कॉँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी केलेल्या तक्रारींची प्रदेश कॉँग्रेसने गंभीर दखल घेऊन संबंधितांवर हकालपट्टीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला. जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्याकडे जिल्'ातील अन्य विधानसभा मतदारसंघांतीलही उमेदवारांकडून काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांबद्दल तक्रारी आल्या आहेत. अशा पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसंबंधीचा अहवाल लवकरच प्रदेश कॉँग्रेसकडे पाठविला जाणार असल्याचे पानगव्हाणे यांनी सांगितले. प्रदेश कॉँग्रेसने आता स्वच्छ कॉँग्रेस अभियान हाती घेतले असून, पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला जाणार आहे. कॉँग्रेसमध्ये बंडखोरांना अजिबात थारा नाही. दरम्यान, प्रदेश कॉँग्रेसची शुक्रवारी या विषयावर बैठकही होणार असल्याचे पानगव्हाणे यांनी सांगितले.
पक्षविरोधी कारवायांबद्दल कॉँग्रेसमधून तिघांची हकालपट्टी
By admin | Published: December 04, 2014 11:55 PM