मालेगाव : गेल्या दोन दिवसांपासून कांद्याच्या प्रति क्विंटल दरात अडीचशे ते तीनशे रूपये घट झाली आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादकांनी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी केंद्रावरील लिलाव तब्बल तीन तास बंद पाडला होता. बाजार समितीच्या पदाधिकारी व प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर दुपारनंतर लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आला होता.मुंगसे कांदा खरेदी केंद्रावर गेल्या आठवड्यात ९०० रूपये प्रति क्विंटल दरापर्यंत कांदा खरेदी केला जात होता. बुधवारी १०० वाहनांमधील कांद्याची लिलाव झाल्यानंतर कांद्याच्या दरात अडीचशे ते तीनशे रूपये घट झाल्याची बाब शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. ९०० रूपये क्विंटलने जाणारा कांदा ५०० ते ६०० रूपये क्विंटल दराने व्यापारी खरेदी करीत होते. घसरत्या दरामुळे कांदा उत्पादकांनी संताप व्यक्त करीत तब्बल तीन तास लिलाव बंद पाडले होते. बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, संचालक वसंत कोर, सचिव अशोक देसले यांनी मुंगसे केंद्रावर धाव घेत शेतकºयांची समजूत काढली. यानंतर लिलाव प्रक्रिया पूर्ववत झाली. सुमारे १० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण होत आहे. यामुळे कांदा उत्पादकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
मुंगसे कांदा मार्केटला तीन तास लिलाव ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 5:44 PM