नाशिक : शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून सिडकोत एका मुलाला आणि वृद्धेला गंभीर जखमी करण्यात आले. परंतु मोकाट जनावरे पकडण्याची कोणतीही व्यवस्था महापालिकेकडे नाही. यापूर्वी दोन वर्षे काम करणाऱ्या ठेकेदाराचे तीस लाख रुपयांचे देयक थकले आहे. त्यानंतर वर्षभरापासून महापालिका ठेकेदाराच नियुक्त करू शकलेली नाही.शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर असून, महापालिकेने कोंडवाडे बांधले, परंतु त्यात जनावरेच नाही अशी अवस्था आहे. महापालिकेने यापूर्वी काही वेळा ठेकेदार नियुक्त केले होते. यापूर्वी २०१६ ते १८ या कालावधीत ज्या ठेकेदाराने काम केले त्याचे सुमारे तीस लाख रुपयांचे देयक थकले असून, वर्षभरापासून हा ठेकेदार घिरट्या घालत असून, त्याला अद्याप देयक मिळालेले नाही. हे बिल देण्यास का टाळाटाळ केली जात आहे हे संबंधित ठेकेदारालाही माहिती नाही. सदरच्या ठेकेदाराला सातशे रुपये प्रति मोठे जनावर पकडण्यासाठी आणि सुमारे १४० रुपये प्रति दिन जनावरांचा सांभाळ करताना त्यांच्या खाद्यासाठी देण्याची तरतूद होती.
ठेकेदाराचे तीस लाख थकले, जनावरे पकडण्याचा ठेका बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 2:04 AM