नाशिक : ऐन सणासुदीचा काळ तोंडावर असताना शहरात पुन्हा गुन्हेगारीच्या घटनांनी डोके वर काढले आहे. नाशिककरांच्या वाहनांच्या काचा फोडून ऐवज लांबविणे असो किंवा वृध्द महिलांना ‘टार्गेट’करून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढणे असो, अशाप्रकारच्या घटना पुन्हा वाढल्याने नाशिककरांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बुधवारी (दि.२६) सकाळी वीस मिनिटांत तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना घडल्या. एकीकडे दोन दिवसांपासून हेल्मेटसक्तीची विशेष मोहीम राबविली जात असून पोलीस रस्त्यावर उतरले आहे तरीदेखील चोरटे हेल्मेट परिधान करून सोनसाखळी हिसकावण्याचे धाडस पोलिसांच्या नाकावर टिच्चून करत आहेत. दोन दिवसांत सहा ते आठ घटना घडल्या असून ५ घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे २ लाख ४४ हजार रूपये किंमतीचे आठ ते दहा तोळे सोने लूटून पोबारा केला आहे.पोलीस प्रशासनाने हेल्मेट सक्तीची मोहीम शहरात जाहीर करताच सोनसाखळी चोरीच्या घटनांना वेग आला. सोमवारपासून बुधवारपर्यंत ७ घटनांमध्ये लाखो रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटला आहे. या घटनांमध्ये चोरट्यांनी केवळ वृध्द महिलांना ‘लक्ष्य’ केले आहे.बुधवारी सकाळी ७ वाजता मिनाताई ठाक रे स्टेडियम हिरावाडी रस्त्यावरून पायी जात असलेल्या आजीबाई सुरेखा राजेंद्र उपासनी (६२) यांच्या गळ्यातील दोघा हेल्मेटधारक दुचाकीस्वारांनी सोनसाखळी हिसकावली. यावेळी आजी वेळेत सावध झाल्याने चोरट्यांच्या हाती अर्धीच सोनसाखळी लागली. अधी तुटलेली सोनसाखळी आजींकडे सलामत राहिली. मात्र या जबरी चोरीत २० हजार रपयांचे सोने लुटून चोरटे फरार झाले. हिरावाडीमधील चोरी काही अंशी फसल्याने याच चोरट्यांनी बहुदा पत्ता विचारण्याचा बहाणा करत दोघा दुचाकीस्वारांनी काठे गल्ली परिसरातील नाविन्यनगरमधून पायी जाणाऱ्या शालिनी रघुनाथ सोनांबेकर (७०) यांच्या गळ्यातील २ तोळ्याची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला असण्याची शक्यता आहे. कारण ही घटना अवघ्या दहा मिनिटांत घडली. ७ वाजून १० मिनिटाला चोरट्यांनी सोनांबेकर यांची सोनसाखळी खेचली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांत पुन्हा दोघा दुचाकीस्वारांनी प्रमोद महाजन उद्यानाच्या पाठीमागील रस्त्यावर एका ५५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविली.मंगळवारी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल यांनी नाशिक परिक्षेत्रातील जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांची आयुक्तालयात संयुक्त बैठक घेत सतर्कतेच्या सूचना देत नागरिकांच्यादृष्टीने चोख पोलीस बंदोबस्त सणासुदीच्या काळात ठेवून कायदा सुव्यवस्था कायम राखण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांसह, उपआयुक्त, पोलीस अधिक्षक, अपर अधिक्षक, सहायक आयुक्तांना दिल्या. बैठक होऊन रात्र उलटत नाही तोच पुन्हा सोनसाखळी चोरट्यांनी शहर पोलिसांना आव्हान दिले. आगामी गणेशोत्सवात नाशिककर मोठ्या संख्येने सार्वजनिक मंडळांचे गणेशमुर्ती, देखावे बघण्यासाठी बाहेर पडणार आहे. तत्पुर्वी शहर पोलिसांना सोनसाखळी चोरी करणारे, कारफोडी, घरफोडी करणा-या चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्या लागणार आहेत अन्यथा गुुन्हेगारीच्या घटनांमध्ये अधिकच वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२० मिनिटांत तीन घटना : पोलीसांची हेल्मेटसक्ती; चोरट्यांची सोनसाखळी ‘मोहिम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 1:24 PM
चोरटे हेल्मेट परिधान करून सोनसाखळी हिसकावण्याचे धाडस पोलिसांच्या नाकावर टिच्चून करत आहेत.
ठळक मुद्दे दोन दिवसांत सहा ते आठ घटना घडल्या ५ घटनांमध्ये सुमारे २ लाख ४४ हजार रूपये किंमतीचे सोने लूटून पोबाराचोरट्यांनी केवळ वृध्द महिलांना ‘लक्ष्य’ केले आहे.