नाशिक : महात्मा गांधी रोडवरील वकीलवाडीत असलेला जुना महाकाय कडुनिबांचा वृक्ष कोसळून तिघे गंभीर झाल्याची घटना शनिवारी (दि़ १६) दुपारच्या सुमारास घडली़ या घटनेमध्ये जखमी झालेले अमोल नंदकिशोर वैद्य (२४, रा. इंदिरागनर) हसीम कुरेशी (२५, रा. सिडको, नाशिक) व आणखी एकाची स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका करून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले़ दरम्यान या झाडाखाली दबल्या गेलेल्या पाच दुचाकी व दोन कारचेही मोठे नुकसान झाले़वकीलवाडीतील हाजी मिठाईसमोर असलेला जुना कडुनिंबाचा वृक्ष दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक कोसळला़ हा वृक्ष कोसळत असल्याचे बघणाऱ्या नागरिकांनी आरडाओरड केल्याने रस्त्यावर असलेल्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली मात्र वैद्य, कुरेशी व आणखी एक असे तिघे जण या वृक्षाखाली दबले गेले़ तसेच हा वृक्ष शेजारीच असलेल्या विद्युत खांबावर पडल्याने शॉर्टसर्किट होऊन मोठा आवाजही झाला़ स्थानिक नागरिकांनी या तिघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र विद्युत प्रवाहामुळे अडचणी येत होत्या़या घटनेची माहिती नागरिकांनी पोलीस व अग्निशमन दलास दिल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशमन अधिकारी अनिल महाजन, राजेंद्र बैरागी, डी़ जी़ गायकवाड यांच्यासह मुख्यालय, पंचवटी तसेच के़ के. वाघ महाविद्यालयाजवळील सुमारे २५ जणांचे पथक, दोन अग्निशमन बंब, दोन रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल झाले़ या झाडाखाली अडकलेल्या हसीम कुरेशी या युवकाची स्थानिक नागरिकांनी सुटका केली़ या वृक्षाच्या बुंध्याजवळ दुचाकीसह अडकलेले अमोल नंदकिशोर वैद्य व इतरांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाला एअर बॅगचा वापर करावा लागला़ दरम्यान यातील जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान दोन वर्षांपूर्वी फांदी अंगावर पडल्याने जखमी झालेल्या नरेंद्र अय्यर यांनी हा वृक्ष तोडण्याची मागणी केली होती़ अग्निशमन, पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने अवघ्या सव्वा तासात वृक्ष बाजूला करून वाहतूक सुरळीत केली़ (प्रतिनिधी)
वकीलवाडीत वृक्ष कोसळून तीन जखमी
By admin | Published: July 17, 2016 12:42 AM