ओझर टाऊनशिप/आझादनगर : ओझर येथील मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या खंडेराव मंदिरापासून थोड्या अंतरावर बाणगंगा पुलाजवळ एस.टी. बसवर विंगर गाडी समोरून धडकल्याने झालेल्या अपघातात एका महिलेसह तीन जण ठार, तर १५ जण जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे पावणेतीन वाजेच्या सुमारास नंदुरबार आगाराची बस (एमएच १४ बीटी- २१३९) नाशिकहून नंदुरबारकडे जात असताना त्याच सुमारास मालेगावहून नाशिककडे जाणाऱ्या विंगर गाडीच्या (एमएच ०४ डीएन ३०५३) चालकाने ओझरजवळील बाणगंगा पुलावर नाशिककडे जाणाऱ्या बाजूच्या रस्त्याने गाडी न टाकता नाशिककडून येणाऱ्या बाजूने टाकून विरुद्ध दिशेने जाऊन सदर बसवर धडकली.मालेगाव शहरातील प्रतिष्ठित फळ व्यापारी मोहंमद फकिरा फल्लीवाले हे सौदी-अरेबियातील मक्का मदिना येथे (हज यात्रा) गेले होते. सोमवारी सकाळी मुंबई विमानतळावर त्यांचे आगमन होणार असल्याने त्यांना घेण्यासाठी त्यांचे बंधू शेख आमीर शेख सादीक आपल्या परिवारासह नातेवाइकांना घेऊन जात होते. मुंबई येथे जात असताना त्यांचा टाटा विंगर गाडीचा ओझर येथे अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, विंगर गाडीच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. यात शेख आमीर मोहंमद सादीक (३७), पत्नी सुमैय्या शेख आमीर मोहंमद (३२) व त्यांचा भाचा शेख रियाजुद्दीन कमरुद्दीन (३०) हे जागीच ठार झाले तर मुजम्मील शेख, विजदान शेख आमीर (१३), शेख साकीब फकीर मोहंमद (१५), गौसिया शेख मुजम्मीर (३२), परवीन इमरान खान (३७), नाहीद शेख वजीर मोहंमद (२५), साबीर शेख शेख (२८), अहमद शेख वजीर मोहंमद (४) रैय्यान श्ेख आमीर (५), नोमान श्ेख मोहंमद आमीर (३) असे दहा जण जखमी झाले. अपघाताचे वृत्त समजताच मालेगाव मध्यचे आमदा आसीफ शेख व नातेवाईकांनी ओझर येथे धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविले. मृतावर शवविच्छेदन करुन रात्री उशीरा आयेशानगर कब्रस्तान येथे दफन विधी करण्यात आला. या अपघातासंदर्भात ओझर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रकाश मेटे यांचेसह ओझर पोलिस करीत आहेत.
ओझरनजीक अपघातात मालेगावचे तीन ठार
By admin | Published: June 15, 2015 11:01 PM