नाशिक : गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने दिवाळीच्या तोंडावर घरात अंधार पसरलेला. ड्युटी मिळेलच याचीही शाश्वती नाही. घामाच्या पैशांसाठी कुटुंबीयांसह एसटी कर्मचारी आक्रोश आंदोलन करीत असताना बसमध्ये राहिलेली एका प्रवाशाची तीन लाखांची बॅग चालक व वाहकांनी परत करून आपल्या कर्तव्याचे प्रामाणिक दर्शन घडविले. वेतनाच्या आक्रोशातही या कर्मचाऱ्यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा एस.टी. विषयी विश्वासार्हता निर्माण करणारा ठरला आहे.
रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास वाडा आगाराची अक्कलकुवा बस नाशिकला दाखल झाली. त्यातून सुरेश सोहली हे प्रवासी उतरले आणि बस पुढील प्रवासासाठी रवाना झाली. काही वेळानंतर सोहली यांना आपली तीन लाख रुपये असलेली पैशांची बॅग बसमध्ये राहिल्याचे लक्षात आले. त्यांनी वाहतूक नियंत्रक आर. एम. मथुरे यांना कळविले.
मथुरे यांनी वाडा येथील आगाराशी संपर्क करून वाडा-अक्कलकुवा मालेगावमार्गे निघालेल्या वाहकाचा मोबाईल क्रमांक मिळविला. वाहकाशी संपर्क करून बसमधील बॅग ताब्यात घेण्यास सांगितले. बसमध्ये नवीन प्रवासी बसण्यापूर्वीच पैशांची बॅग वाहकाने ताब्यात घेतली. सोहली यांना मालेगाव येथे पाठविले. तेथे त्यांना बसचे वाहक गणेश आसाराम धनगर आणि चालक सदानंद आत्माराम गुरव यांनी तीन लाख तीनशे रुपयांची रोकड असलेली बॅग परत केली.