नाशिकरोड : एअर होस्टेसची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून जेलरोड परिसरातील तरुणीच्या वडिलांकडून तीन लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी तरुणीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
जेलरोडच्या सैलानी बाबा स्टॉपजवळील हेरंब अपार्टमेंटमधील रहिवासी रणधीरकुमार केशोप्रसाद सिन्हा (५०) यांना दि. २८ मे ते १९ आॅगस्ट या कालावधीत संशयित आऱ दास नावाच्या व्यक्तीने ८४७४९६४५९० या मोबाइलवरून फोन करून मुलीला मुंबईत एअर होस्टेसची नोकरी लावून देतो असे आमिष दाखविले़ सिन्हा यांचा दास यांच्यावर विश्वास बसल्याने त्यांनी दासच्या सांगण्यानुसार त्याच्या बँक खात्यात दोन लाख ९१ हजार ३०० रुपये नेटबँकिंगद्वारे भरले़ यानंतर मुलीला नोकरी केव्हा मिळणार याबाबत विचारणा करण्यास सुरुवात केली़
मात्र, काही कालावधीनंतर संशयित फोन उचलत नसल्याने तसेच फोन बंद असल्याने आपली फसवणूक झाल्याचे सिन्हा यांच्या लक्षात आले़ त्यांनी या फसवणुकीबाबत उपनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे़