नाशिक : महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंध असलेल्या परराज्यातील सुमारे तीन लाख रुपयांचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली फाटा परिसरातून शनिवारी (दि़२८) जप्त केला़ याप्रकरणी संशयित छोटूभाई पुन्याभाई कागडे (४४) आणि चंद्रकांत राजेश देसाई (३६, दोघे रा. जिल्हा डांग, राज्य गुजरात) या दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे़ राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी अंबोली फाट्यावर नाकाबंदी केली होती़ यावेळी पिकअप वाहनाची (एमएच १२ सीटी ४६१४) तपासणी केली असता त्यामध्ये केवळ दादरा नगरहवेली येथे विक्रीची परवानगी असलेला तसेच महाराष्ट्रात प्रतिबंध असलेला मद्यसाठा आढळून आला़पोलिसांनी या वाहनातील संशयित छोटूभाई आणि चंद्रकांत या दोघांना अटक केली आहे़ तसेच पिकअप व मद्यसाठा असा ३ लाख ३ हजार ७०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ दरम्यान, ११ जुलै २०१८ रोजी तिघा संशयितांकडून ४ लाख २० हजार रुपयांचा मद्यसाठा व वाहन जप्त करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे आणि अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक मधुकर राख, दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, अरुण सूत्रावे, जवान वीरेंद्र वाघ, सुनील पाटील, विलास कुवर, विष्णू सानप, पूनम भालेराव यांच्या पथकाने ही कारवाई केली़
अंबोली फाट्यावर तीन लाखांचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:34 AM