नाशिक : गरिबांचे इंधन म्हणून ओळखले जाणारे घासलेट अनुदानित दरात पुरविण्यास आजवर खळखळ करणाऱ्या राज्य सरकारने मार्च महिन्यात मेहेरबान होत प्रत्येक व्यक्तीस तीन लिटर घासलेट देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला अतिरिक्त वाढीव कोटा मंजूर केला आहे. शासनाच्या या निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील दीड लाख शिधापत्रिकाधारकांना होणार आहे. शिधापत्रिकाधारकांना रेशनवर घासलेट देण्याऐवजी थेट पात्र शिधापत्रिकाधारकांच्या बॅँक खात्यावर घासलेटचे अनुदान वर्ग करण्याबाबतची चर्चा गेल्या वर्षभरापासून होत असताना शासनाने बहुधा आपल्या पूर्वीच्याच पद्धतीवर ठाम राहण्याचा निर्णय घेतल्याचे उपरोक्त बाबीवरून स्पष्ट होत आहे. यापूर्वी शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या मागणीच्या प्रमाणात घासलेट पुरविण्यात राज्य सरकारने नेहमीच हात अखडता घेतला, मागणीपेक्षा जवळपास ५० टक्क्यांपेक्षा कमी घासलेटचा पुरवठा होत असल्यामुळे प्रति कार्डधारकास जेमतेम दोन ते तीन लिटर घासलेट महिन्याकाठी मिळत होते, त्यामुळे अनेकांना काळ्याबाजारातून जादा पैसे मोजावे लागत. ऐन थंडीच्या दिवसात स्वयंपाकासाठी पुरेसे इंधन गोरगरिबांना न मिळाल्याने त्यांना अन्य पर्यायांचा मार्ग अवलंबवावा लागला. आता मात्र शासनाने सार्वजनिक वितरणप्रणाली नागरिकांच्या आधारकार्डाशी जोडल्यामुळे ज्यांचे आधारकार्ड क्रमांक नोंदणी झाले अशानाच या योजनेचा लाभ मिळू लागला आहे. सुमारे तीन लाखांहून अधिक शिधापत्रिकाधारकांपैकी निम्म्या कार्डधारकांनी आधारकार्ड क्रमांक जोडल्यामुळे साहजिकच लाभेच्छुकांनी संख्या कमी झाली आहे. त्यामुळे शासनाने मार्च महिन्यापासून प्रती व्यक्तीस प्रत्येकी दोन लिटर व एक लिटर अतिरिक्त असे तीन लिटर घासलेट देण्याचे ठरविले आहे.
प्रत्येक व्यक्तीस तीन लिटर घासलेट
By admin | Published: March 05, 2017 1:44 AM