जिल्ह्यातील शासकीय जमिनीवर गौण खनिजाचे खनिपट्टे पाच वर्षांकरिता ई-निविदा पद्धतीने लिलावात दिले जाणार आहे. दि. २७ पासून सकाळी दहा वाजेपासून सहभागी होणाऱ्यांना नेांदणी करता येणार आहे. १० ऑगस्टपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणीसाठीची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीतच ऑनलाइन पद्धतीने निविदा जमा करावी लागणार आहे.
पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये ११ तारखेला दुपारी ३ वाजेपासून पुढे ई-निविदा उघडण्यात येणार आहेत. वडाळीभोई गावातील गट क्रमांक ४७५/ब, चांदवड तालुक्यातीलच खडकजांब गावातील गट क्रमांक ७००, तर निफाड तालुक्यातील डोंगरगाव येतील गट क्रमांक ४१० येथील शासकीय जमिनींवरील खाणपट्ट्यांचे लिलाव केले जाणार आहेत. पाच वर्षे कालावधीसाठी खाणपट्ट्यांचा लिलाव दिला जाणार आहे.
जिल्ह्यातील खाणपट्ट्यांचे लिलाव सुरू करण्याची अनेकांना प्रतीक्षा होती. अवैध उत्खनन तसेच महसूलवाढीसाठी शासकीय जमिनींवरील खाणपट्ट्यांचे लिलाव करण्याची मागणी होत होती. मात्र शासनाकडून परवानगी नसल्याने लिलावप्रक्रिया कधी सुरू होणार, याबाबतची विचारणाही केली जात होती. गौण खनिज विभागाने आता लिलावाची प्रक्रिया सुरू केली असून, यामुळे शासनाच्या महसुलात वाढ होणार आहे.