लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दुचाकीवरून येऊन हातातील मोबाइल खेचून नेणाऱ्या तिघा संशयितांना अंबड पोलिसांनी अंबड लिंकरोड परिसरात राबविलेल्या कोम्बिंग आॅपरेशनमध्ये अटक केली़ या तिघांकडून चोरीचे सहा मोबाइल व दुचाकी असा एक लाख २८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ दोनमधील अंबड पोलीस ठाणे हद्दीत काही दिवसांपासून नाकाबंदी तसेच कोम्बिंग आॅपरेशन सुरू आहे़ त्यानुसार अंबड लिंक रोडवर रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या कोम्बिंगदरम्यान दुचाकीवरील संशयित गोपाळ जगन्नाथ पाटील (वय २०, रा. श्रीकृष्ण रो-हाउस, धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर, सातपूर), सागर दिलीप वाघ (२०, रा. शिवाजीनगर, सातपूर), कुणाल विशाल सूर्यवंशी (१९, रा. धर्माजी कॉलनी, सातपूर) या थांबविले असता त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला़ या तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सरकारवाडा व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे मोबाइल खेचल्याची कबुली दिली़ परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, दत्तात्रय पिसे, शंकर काळे, चंद्रकांत गवळी यांनी ही कामगिरी केली.
कोम्बिंग आॅपरेशनमध्ये तीन मोबाइल चोरटे जेरबंद
By admin | Published: May 11, 2017 2:11 AM