नाशिक : आठ वर्षांपूर्वी भगवती चौक परिसरात विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी त्यावेळेच्या एका महिला नगरसेवकाच्या विनयभंग प्रकरणी संशयित आरोपी किरण मोहिते याने विकासकामात अडथळा आणून महिला नगरसेवकाचा हात ओढून बाजूला केले होते. यावेळी पीडित नगरसेविकेने अंबड पोलीस ठाण्यात मोहिते व सुभाष घरटेविरुध्द फिर्याद दिली होती. फिर्र्यादीनुसार संशयिताविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला सुरू होता. गुरुवारी (दि.२२) खटल्यावर सुनावणी होऊन अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी. के. गावंडे यांनी पुराव्यांच्या आधारे मोहिते यास दोषी धरले. त्यास तीन महिन्यांचा कारावास व १ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. घरटे यांच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध न झाल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारी पक्षाकडून अॅड. विद्या देवरे-निकम यांनी बाजू मांडली. महिला सक्षमीकरणासाठी न्यायालयाने दिलेला हा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरणारा असल्याचे देवरे-निकम यांनी सांगितले.
नगरसेविकेच्या विनयभंग प्रकरणी तीन महिने कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 1:44 AM