सुरगाणा : बोरगाव -कनाशी मार्गावरील गायदरी घाटात बुधवारी मध्यरात्री सव्वादोन वाजेच्या सुमारास एक खासगी बस दरीत कोसळ्याने अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून, २५ प्रवासी जखमी झाले.नवसारी येथील हिर ट्रॅव्हलची बस (जीजे ५, एझेड ४८५०) ५६ प्रवाशांना घेऊन गणदेवी (जि.नवसारी) येथून सप्तशृंगी गडाकडे जात होती. हतगडच्या पुढे कनाशी रस्त्यावरील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस गायदरी घाटात पलटी झाली. अपघाताचा आवाज ऐकून शृंगारवाडी येथील ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गस्तीवर असलेले निरीक्षक मच्छिंद्र दिवे तसेच कळवणचे पोलीस उपविभागीय अधिकारी देवीदास पाटील, घुमरे, आर. पी. निकम आदींसह पोलीसपाटील गणेश जाधव व ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केले. या अपघातात गीताबेन पटेल (४२), फाल्गुनीबेन पटेल (२६, दोघीही रा.गणदेवी जि. नवसारी) व जमील मुकेश पटेल (४, रा. भिनार, ता. दलालपूर जि.नवसारी) या तिघे जागीच मृत झाले तर पंचवीस जण जखमी झाले. जखमींपैकी आठ जणांना सापुतारा येथे तर उर्वरितांना नाशिकच्या जिल्हा शासकीय ग्रामीण रु ग्णालय दाखल करण्यात आले आहे. बसचालक जयमीन शंकर पटेल हा किरकोळ जखमी झाला असून, त्याच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गॅस कटरचे प्रयत्नही अपयशी
अपघात झाल्यानंतर एक मयत महिला व जखमी झालेला सात वर्षाचा मुलगा बसमध्ये अडकून होते. शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांना काढता येत नव्हते. त्यामुळे जनरेटर व गॅस कटर आणले. गॅस कटरने पत्रा कापूनही यश मिळत नव्हते. अखेर बस ज्या झाडावर आदळली होती त्याच झाडाची फांदी तोडून व टॉमीच्या साहाय्याने पत्रा वाकवून मृत महिला व जिवंत मुलाची सुटका करण्यात आली.