मालेगाव मध्य : शहरातील सर्वच कोवीड सेंटर व क्वारण्टाईन सेंटर बंद करून मनपाच्या वतीने तीन दिवसांपुर्वीच कार्यान्वित करण्यात आलेल्या सहारा कोवीड सेंटर येथे आज शुक्रवारी तीन रुग्णांचा मृत्यु झाला तर एकाचा दाखल करण्यापूर्वीच पुर्वीच मृत्यु झाला आहे.दोन महिन्यांपूर्वी शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते.त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन वेळा शहरास भेट देत आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार सामान्य रुग्णालय,जीवन रुग्णालय,मन्सुरा महाविद्यालय, मसगा महाविद्यालय, फारान हॉस्पिटल व हज प्रशिक्षण केंद्र अशा विविध ठिकाणी कोवीड सेंटर व क्वारण्टाईन सेंटर कार्यान्वित करण्यात आले होते. प्रशासनाने घेतलेल्या कठोर परिश्रम , युनानी डॉक्टरांची मेहनत व नागरीकांनी केलेल्या सहकार्यामुळे शहरातील बाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.त्यामुळे मनपाने हळुहळू काही रुग्णालये बंद केली होती. परंतु ग्रामीण भागात कोरोना बाधितांमध्ये वाढ होत असल्याने मसगा महाविद्यालय,फारान हॉस्पिटल व हज प्रशिक्षण केंद्र येथे कोवीड सेंटर व क्वारण्टाईन सेंटर सुरू होते. मनपा कडुन मसगा महाविद्यालय वगळता दोन्ही सेंटर बंद करीत एकाच छताखाली २३० खाटांचे कोवीड व क्वारण्टाईन सेंटर तीन दिवसांपूर्वी सुरु करण्यात आले आहे. मनपा आयुक्त त्र्यंबक कासार, आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे व संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक सुविधांची पाहणी करून एक प्रकारे रुग्णालय सुरू करण्याबाबत हिरवा कंदील दिला होता. परंतु येथील सुविधांबाबत अवघ्या तीन दिवसांत रुग्णांच्या नातलगांच्या वतीने तक्रारी होत आहेत. तीन दिवसांत ५८ रुग्ण दाखल झाले आहेत.
सहारा कोवीड सेंटरमध्ये तीन रुग्णांचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 11:28 PM