नाशिक (सुयोग जोशी) : एकीकडे शहरात ३१ डिसेंबरची धूम सुरू असतांना दुसरीकडे कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचे तीन रुग्ण आढळून आले आहे. यातील एका रूग्णावर खाजगी तर दोघांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. नव्या वर्षाच्या सुरूवातीला रुग्ण मिळून आल्याने मनपा आरोग्य विभाग सतर्क झाले असून नागरिकांनी विशेष खबदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक पुरुष रुग्ण अंबड परिसरातील असून दोन महिला रुग्ण सातपूर भागातील असल्याचे समजते. एका महिला रुग्णावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात तर एक पुरुष व एका महिलेस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. करोनाच्या नव्या व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे विशेष दक्षता घेण्यात येत आहे. ३१ डिसेंबरच्या पाश्व'भूमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले होते. गेल्या २४ डिसेंरबरपासून शहरातील मनपाच्या रुग्णालयांमध्ये रॅपिड अँटिजन टेस्टची सुविधा करुन देण्यात आली आहे.
यामध्ये नाशिरोडच्या जेडीसी बिटको रूग्णालय, स्वामी समर्थ रूग्णालय, सिडकोच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात चाचण्या केल्या जात आहे. मात्र आतापर्यंत सुमारे २०० जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या असतांना (दि.३१) सकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागानेही विशेष खबरदारी घेत शहरात सुमारे ४०० बेडसह ऑक्सीजन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. नव्या व्हेरीयंटचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांना दुर्धर आजार आहेत त्यांना या न्यू व्हेरिएंटचा धोका जास्त आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी घाबरू नये, सतर्कता बाळगावी असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे.