संदीप झिरवाळ
पंचवटी (नाशिक) : काल गुरुवारी (दि 28) गणेश विसर्जन निमित्ताने संपूर्ण देशात धामधूम सुरू असतांना नाशिकमध्ये गोदावरी नदीत गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी आलेल्या तिघा भविकांवर काळाने झडप घातली आहे. वाहत्या पाण्यात पाय घसरून पडल्याने तिघा जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती पंचवटी अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली आहे.
शुक्रवारी (दि.29) सकाळी 9 वाजता संत गाडगे महाराज धर्मशाळे समोर गोदावरी नदीच्या पात्रात असलेल्या हनुमान मंदिर जवळ पाण्यात काल गोदावरी नदीच्या पात्रात बुडालेल्या तिघा युवकांचे मृतदेह सापडल्याच्या वृत्ताला पंचवटी अग्निशमन दलाचे लिडिंग फायरमेन संजय कानडे यांनी दुजोरा दिला आहे.
काल गुरुवारी गणेशोत्सव विसर्जन दरम्यान सायंकाळी दोन ते तीन गणेश भक्त गोदावरी नदीच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहात पाय घसरून पडल्याने वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात होती. रात्री उशिरापर्यंत पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीपात्रात बोट उतरवून बुडालेल्या व्यक्तींचे शोध कार्य सुरू केले होते मात्र रात्री अंधार पडल्याने शोध कार्य थांबविण्यात आलेले होते. शुक्रवारी सकाळी अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध कार्य सुरू करताच संत गाडगे महाराज धर्मशाळे समोर असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात हनुमान मंदिर जवळ तिघा जणांचे मृतदेह आढळून आले आहेत.
सर्व मयत हे 20 ते 25 वयोगटातील असल्याचे सूत्रांनी सांगितले. नदीपात्रात बुडून मृत्यू झालेले इसम कोण व कुठे राहतात याची ओळख पटलेली नसून काल गणेश मूर्ती विसर्जन करतांना तिघेजण नदीपात्रात बुडाल्याची तक्रार करणाऱ्या नातेवाईकांचा शोध घेत बुडालेल्या व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम पंचवटी अग्निशमन दलातर्फे सुरू करण्यात आले होते.