मनमाड ( नाशिक ) : नांदगाव - मालेगाव रोडवर मध्यरात्री दिडच्या सुमारास नाग्यासाक्या धरणासमोरील नदीवरील कठडे नसलेल्या पुलावरुन मारुती ईको गाडी थेट नदीत कोसळून झालेल्या अपघातात एक लहान बाळासह तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
या अपघातात ५ जण जखमी झाले आहे.अपघातग्रस्त मालेगावातील रहिवाशी असून जालना येथून लग्न सोहळा आटोपून परतत असताना हा अपघात घडला. जखमींवर मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह देशभरात अपघाताच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये मंगळवारी अमृतसरहून वैष्णो देवीकडे (कट्रा) जाणारी बस दरीत कोसळली. यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या वाहनांबरोबरच रस्ते अपघातांच्याही घटना वाढल्या आहेत. या अपघातांमध्ये रस्त्यावरून चालताना प्राण गमावलेल्या पादचाऱ्यांची संख्या मोठी आहे. २०१९ ते २०२२ या चार वर्षांत १० हजार ६१७ पादचारी रस्ते अपघातांचे बळी ठरले आहेत.