काेराेना जागतिक महामारीच्या काळात अनेकांचे राेजगार बुडाल्याने उपजीविकेसाठी बहुतांश लाेकांनी उदरनिर्वाहासाठी भाजीपाल्यासह वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत. शिवाजीनगर परिसरात ठिकठिकाणी बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर महापालिकेच्या वतीने नेहमीच अतिक्रमणाची कारवाई केली जात हाेती. प्रभागाचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी यावर ताेडगा काढून सर्व भाजीविक्रेत्यांना कार्बन कंपनीच्या भिंतीलगत जागा उपलब्ध करून दिली. तेव्हापासून या ठिकाणी एकाच रांगेत भाजीविक्रेते व्यवसाय करत आहेत. मात्र, याचा फायदा काही ‘संधीसाधू’ घेत असून एकाने तर चक्क पानटपरीच्या नावावर थ्री फेज वीज कनेक्शन घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्याने भाजी विक्रेत्यांसाठी कार्बन कंपनीच्या भिंतीलाच विद्युत जाेडणी करून सर्वांसाठी स्वीच उपलब्ध करून दिले. या माेबदल्यात एका विक्रेत्याकडून एका एलइडी बल्बसाठी पंधरा रुपये तर दाेन बल्बसाठी तीस रुपये दरराेजची आकारणी केली जात असल्याचे समजते. या ठिकाणी जवळपास ४०० विक्रेते व्यवसाय करीत आहेत. एका भाजी विक्रेत्याकडून दिवसाला तीस रुपये अर्थातच एका महिन्याला नऊशे रुपये वसूल केले जातात आणि महावितरणला हजाराच्या रकमेत बिल अदा केले जात असल्याचे सांगण्यात आले. ही बाब महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात कशी आली नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
इन्फो==
सदर अर्जदाराने मागणी केल्यानुसार थ्री फेजचे कनेक्शन दिले हाेते. मात्र, त्यांनी कनेक्शनचा वापर भाजी विक्रेत्यांसाठी केल्याबाबतची माहिती नाही. हा प्रकार चुकीचा आहे. त्यांचे वीज कनेक्शन तात्काळ रद्द केले जाईल.
-ऋषिकेश जाेगळेकर, सहायक अभियंता
(फोटो १५ वीज)