नाशिक : शहरातील अर्थचक्र पूर्वपदावर आले होते मात्र दुसरी लाट आल्याने कोरोनाच्या संख्येत वाढ झालेली आहे ही बाब चिंताजनक असून नागरिकांनी याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. शहरात रुग्णांची संख्या वाढत असून प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी त्रिसूत्रीचा अवलंब व शिस्तीचे पालन करणे आवश्यक झाले असल्याचे मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना सांगितले.
अर्थचक्र आणि आरोग्यचक्र यात समतोल साधून वेगळा आदर्श आणि इतर राज्य व जिल्हा समोर ठेवू असे आयुक्त जाधव यांनी सांगितले.
प्रशासनाने सक्ती करणे ऐवजी प्रत्येकाने स्वतः जबाबदारी पाळून आपल्या स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्यासाठी घराबाहेर पडल्यास सामायिक अंतर ठेवणे,मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. मी नाशिककर, जबाबदार नाशिककर अशी स्वतः शपथ घ्यावी. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असा ठाम निश्चय करून अर्थचक्र आणि आरोग्यचक्राचा समतोल साधण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रशासनाबरोबरच नागरिकांनी देखील त्यासाठी प्रयास करुन एक वेगळा आदर्श इतर राज्य व जिल्ह्यांसमोर ठेवावा, असेही त्यांनी नमूद केले. ज्यावेळी आवश्यकता असेल तेव्हाच घराबाहेर पडावे, आपल्या कुटुंबासाठी शिस्तीचे पालन करावे. कोरोनाविरुद्धचा हा लढा प्रशासन आणि नागरिक यांनी एकत्रित द्यायचा आहे. नाशिक शहरातील नागरिकांचा मास्क वापराचे प्रमाण वाढलेले असून ही आनंदाची बाब आहे. आपण सर्वांनी मिळून कोरोनाची लढाई यशस्वी करायची असून प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी आयुक्त जाधव यांनी केले.