सुरगाणा : बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी आणखी एकाला सुरगाणा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याप्रकरणी तिघांना दिंडोरी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
चार दिवसांपूर्वी उंबरठाण येथे बनावट नोटा चलनात आणणाऱ्या येवल्यातील हरीष गुजर व बाबासाहेब सैद या दोघांना सुरगाणा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी आणखी नाव समोर आल्याने अक्षय राजपूत यास येवल्यातून ताब्यात घेण्यात आले. आणखी एक मुख्य संशयित आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी तिघा जणांना अटक करून दिंडोरी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी तपासाच्या दृष्टीने बाजू मांडली असता न्यायालयाने तिघांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आता अटकेत असलेल्या हरीष वाल्मीक गुजर, बाबासाहेब भास्कर सैद व अक्षय राजपूत ह्या तिघा संशयित आरोपींना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. उंबरठाणच्या बाजारात पेरलेल्या खबऱ्यांमार्फत चलन माफियांचे कारस्थान उघड करण्यात यश आले असून, या बनावट नोट प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
इन्फो
मास्टरमाइंडचा शोध
या प्रकरणातील मास्टरमाइंडला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. त्याच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना झाले असून, तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी या प्रकरणात गोपनीयता बाळगली आहे. येत्या दोन - तीन दिवसांत नकली नोटा छापणारे मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता असून, नकली नोटांचा वापर यापूर्वी कुठे आणि कसा केला किंवा केला जाणार होता तसेच याच्या पाठीमागे कोण आहे याची माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.