संजय पाठक, नाशिक- लोकसभा निवडणूकीत महायुतीचा दारूण पराभव झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील दोन जागांचे मिळून एकूण तीन अहवाल भाजपच्या वतीने सादर करण्यात आले आहेत. त्यावर येत्या शुक्रवारी (दि.१४) मुंबईत होणाऱ्या प्रदेश बैठकीत चर्चा होणार आहे.नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात शिंदे सेना आणि भाजपाचा मोठा मताधिक्क्याने पराभव झाला आहे.
महायुतीतील कोणत्याही घटक पक्षाला उमेदवारीम मिळाली असली तरी केंद्रात भाजपचा सत्ता यावी यासाठी भाजपाच्या वतीने अधिक गांभिर्याने प्रचार यंत्रणा राबवण्यात आली. सलग देान वेळा खासदार झालेले शिंदे सेनेचे हेमंत गोडसे यांचा पराभव उध्दव सेनेच्या राजाभाऊ वाजे यांनी केला. तर दिंडोरी लोकसभा मतदार संघात माजी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांचा पराभव राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी केला.
नाशिकमधील पराभवाबाबत महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव हे नाशिक शहरातील तीन विधान सभा मतदार संघात काय घडले याचा तर नाशिक लोकसभा मतदार संघात येणाऱ्या देवळाली, सिन्नर आणि इगतपुरी विधान सभा क्षेत्राचा अहवाल भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी सादर केला आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघातील पराभवाचा अहवाल भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंकर वाघ सादर करणार आहेत.