-----------
नाशिक : चार महिन्यांपूर्वी पिस्तूलचा धाक दाखवून दुचाकींवरून आलेल्या तिघांनी कापूस व्यापाऱ्याला लाकडी दंडुक्याने मारहाण करीत त्याची जबरी लूट केल्याची घटना घडली होती. या लुटीतील तिघांना धुळे येथून अखेर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या पथकाने शेतातील उत्पादन त्यांच्याकडून पावणेनऊ लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
चाळीसगाव येथील कापूस व्यापारी सुनील श्रावण चौधरी (परा. लोंढे) हे ५ डिसेंबर २०२० रोजी मालेगाव येथून शेतकऱ्यांसोबत व्यवहार करून कापूस खरेदी-विक्रीतून आलेली रक्कम घेऊन दुचाकीने चाळीसगाव येथे जात होते. सायंकाळच्या सुमारास मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावरील मौजे सायने गावाच्या शिवारात तिघा अज्ञात चोरट्यांनी दुचाकीने त्यांचा पाठलाग करीत अंधारात गाठले. चौधरी यांना लाकडी दांड्याने मारून पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेली २० लाख ६ हजार २०० रुपयांची रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ग्रामीण पोलिसांचे पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी गुन्ह्यातील संशयित आरोपी खुशाल अशोक मोकळ, रितिक राजेंद्र राजपूत, अविनाश सुरेश माने (तिघे रा. धुळे) यांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात लुटलेल्या रकमेपैकी ८ लाख ४७ हजार ५०० रुपये हस्तगत केले. न्यायालयात सुनावणी दरम्यान हस्तगत रक्कम फिर्यादी चौधरी यांना प्रदान करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे शुक्रवारी (दि. २) मालेगाव दौऱ्यावर असताना व्यापारी चौधरी यांना ही रक्कम देण्यात आली. यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास धुमणे उपस्थित होते. चौधरी यांना ही रक्कम शेतकऱ्यांना परत करायची होती.