Nashik Lok Sabha ( Marathi News ) : नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत महायुतीत निर्माण झालेला तिढा आज अखेर सुटला असून या मतदारसंघातून पुन्हा एकदा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीच्या जागावाटपात नाशिकची जागा नक्की कोणाकडे जाणार, यावरून गेल्या अनेक दिवसांपासून खलबतं सुरू होती. मात्र आज गोडसे यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आलं. नाशिकमध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली असून ठाकरेंच्या शिवसेनेचेच विजय करंजकर हे बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नाशिकमध्ये तीन शिवसैनिक आमने-सामने येणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून रंगत होती. त्या अनुषंगाने मतदारसंघ पिंजून काढत करंजकर यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली होती. मात्र उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी वाजे यांना संधी दिली. अनेक दिग्गजांचा पत्ता कट करत उमेदवारी मिळवलेले राजाभाऊ वाजे हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. २०१४ साली ते सिन्नरमधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. राजाभाऊ वाजेंना मोठा राजकीय वारसाही लाभला आहे. त्यांचे आजोबा शंकर बालाजी वाजे हे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सिन्नरचे पहिले आमदार होते . त्यांच्या आजी रुक्मिणीबाई वाजे सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार म्हणून १९६७ साली निवडून आल्या होत्या. तसंच राजाभाऊ वाजेंचे वडील प्रकाश वाजे यांनी देखील २००९ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक सिन्नर येथून लढवली होती . विजय करंजकरांची काय आहे भूमिका?
उद्धव ठाकरेंकडून उमेदवारीत डावलण्यात आलेले विजय करंजकर हे बंडाच्या पवित्र्यात आहेत. नुकताच त्यांना लोकसभा उमेदवारीचा अर्जही घेतला आहे. "गेल्या एक दीड वर्षापासून मतदार संघात फिरत होतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला शब्द दिल्यामुळे मी मतदारसंघात फिरत होतो. माझे मतदारसंघात चांगले संबंध आहेत. कोणाच्या सांगण्यावरून माझी उमेदवारी कापली केली गेली, आणि दुसऱ्याला उमेदवारी दिली गेली, मला अजूनही कळत नाही. लोकसभेचा फॉर्म आणला आहे. उद्या, परवा फॉर्म भरणार आहे. सगळ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी माझे घनिष्ट संबंध आहेत. गिरीश महाजन मला नवीन नाहीत, माझी भेट झाली आहे. त्यांनी देखील हे असे कासे झाले, असे मला विचारले होते. मी सर्व गोष्टींचा उहापोह करतोय, येणाऱ्या काळात मी माझी भूमिका घेईन," असं करंजकर यांनी नुकतंच म्हटलं आहे.
हेमंत गोडसे यांची राजकीय कारकीर्द
हेमंत गोडसे यांनी २००९ मध्ये प्रथम मनसेकडून राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा २७००० मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोन वेळा ते निवडून आले आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी छगन भुजबळ यांचा पराभव केला होता, तर २०१९ मध्ये माजी खासदार समीर भुजबळ यांचा त्यांनी पराभव केला होता.