नाशिक/ सिडको : नाशिक शहरात अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या तिघा संशयितांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड एमआयडीसी चुंचाळे पोलिस चौकीचे पोलीस नाईक समाधान चव्हाण यांना गरवारे पॉईंट, तपोवन हॉटेल जवळ अंबड येथे रविवारी (दि. ६)रात्री दीड वाजेच्या सुमारास दिनेश भाऊसाहेब पाटोळे ( ३३, रा. लोहशिंगवे ) हा राजेश राजाराम गार्दुल (२५, रा. गिता चौक, अंबडगांव,) याचेकडुन गांजा खरेदी करण्याकरिता गरवारे पॉईंट, तपोवन हॉटेल जवळ, अंबड येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
पोलिस पथकाने सापळा रचूनराजेश गार्दुल व दिनेश पाटोळे हे दोघे गरवारे पॉईंट येथे येताच त्यांना अंबड एम.आय.डी.सी. चुंचाळे पोलिस चौकीचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक संदीप पवार, रविंद्रकुमार पानसरे समाधान चव्हाण, जनार्दन ढाकणे,अनिल कुन्हाडे सुरेश जाधव, किरण सोनवणे, अर्जुन कांदळकर, तुकाराम शेळके,शशीकांत सोनावणे, दिनेश नेहे यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांचेकडुन १३ किलो गांजा तब्बल ३ लाख ५५ हजार ४२५ रूपये किंमतीच्या मुद्देमालासह जप्त केला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उप निरीक्षक संदीप पवार करीत आहेत.