नाशिक : नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेल्या विधिमंडळ अनुसूचित जमाती समितीने मंगळवारी आदिवासीबहुल आठ तालुक्यांना भेट देत तेथील कामकाजाचा आढावा घेतला. विशेषत: आश्रमशाळा आणि आरेाग्य केंद्रांबाबतची माहिती प्राधान्याने घेण्यात आली.
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेल्या विधिमंडळाच्या समितीने आदिवासी तालुक्यांमध्ये धडक भेटी दिल्या. तीन स्वतंत्र पथके स्थापन करून आदिवासीबहुल आठ तालुक्यांची अचानक पाहणी करण्यात आली. समिती कोणत्या तालुक्यांना भेटी देणार याबाबतची माहिती गोपनीय ठेवण्यात आली होती. त्यामुळे थेट आदिवासी भागात समिती पोहोचल्याने प्रशासनाची धावपळ झाली. समिती सदस्यांनी थेट पाड्यांवर जात स्थानिकांकडून आदिवासी उपाय योजना व त्यांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली.
आमदार दरोडा यांच्या अध्यक्षतेखालील समिती सोमवारपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. पहिल्याच दिवशी शासकीय विश्रामगृहात सर्वच शासकीय विभागांची बिंदुनामावली तपासण्यात आली. मंगळवारी (दि.२४) सकाळीच समितीने तीन पथकांची स्थापना केली. एका पथकाने त्र्यंबक, इगतपुरी या दोन आदिवासी तालुक्यांची प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण केले. दुसऱ्या पथकाने पेठ, दिंडोरी आणि सुरगाण्याच्या काही भागांमध्ये पाहणी केली. तर तिसरे पथक कळवण, बागलाण या आदिवासी तालुक्यांमध्ये पोहोचले. या पथकांनी आदिवासींच्या विकासासाठी असलेल्या विविध योजनांची पाहणी केली. विविध योजनांची पाहणी करतानाच स्थानिक आदिवासींशी संवादही साधला. दरम्यान, समितीद्वारे करण्यात आलेली तपासणी आणि पहिल्या दिवशी घेण्यात आलेल्या बिंदुनामावलीचा आढावा, या सर्वांची एकत्रित माहिती संकलित केली जाणार आहे.
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पुढील बैठका होणार आहेत. तिसऱ्या दिवशी
विविध योजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. या दौऱ्यात झालेल्या बैठका अणि विभागांचा घेतलेला आढावा यावर आधारित अहवाल तयार केला जाणार आहे. तयार होणार अहवाल हा विधिमंडळात समितीद्वारे सादर केला जाणार आहे.