नाशिक - त्र्यंबकेश्वरजवळील दुगारवाडी धबधबा येथे औरंगाबाद येथील कृषी महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी बेपत्ता झाल्याची घटना बुधवारी (दि.१८) उघडकीस आली. यातील एका विद्यार्थीनीचा मृतदेह आढळून आला आहे. ग्रामीण पोलीस आणि जिल्हा प्रशासन इतर दोन बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत.तेलंगणा राज्यातील काही विद्यार्थी औरंगाबाद जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. त्यातील गिरीधर आकाश (२०), व्यंकटेश रेड्डी (२०, दोघे रा. तेलंगणा), काव्या. एल (२०, रा. हैदराबाद), अनुषा (२१), रघुवंशी, कोटी रेड्डी (२०, तिघे रा. तेलंगणा) हे विद्यार्थी त्र्यंबकेश्वर सोमवारी (दि.१६) येथे आले आहेत. मंगळवारी (दि.१७) सर्व विद्यार्थी दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी सायंकाळी ४.३० च्या सुमारास गेले. मात्र उशीर झाल्याने आणि पाण्याचा अंदाज येत नसल्याने काही विद्यार्थी पुन्हा त्र्यंबकेश्वरकडे माघारी फिरले. त्यांनी इतरांना पाण्यात न उतरण्याचा सल्ला दिला.दरम्यान, रात्रभर वाट पाहूनही अनुषा, रघुवंशी आणि कोटी रेड्डी हे परतले नव्हते. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी पुन्हा बुधवारी (दि.१८) दुगारवाडी धबधबा गाठला. त्यावेळी पाण्यात अनुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांशी संपर्क साधून मदत मागवली. त्यानंतर विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले आहे. दुपारपर्यंत रघुवंशी आणि काव्या यांचा तपास लागलेला नव्हता.
त्र्यंबकेश्वरच्या दुगारवाडी धबधब्यात औरंगाबादचे तिघे विद्यार्थी बेपत्ता; युवतीचा मृतदेह सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 4:51 PM