नाशिक : शिव प्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे यांची सभा सुरू असताना त्यांच्या अटके ची मागणी करीत जिल्हा न्यायालयासमोरून जाणा-या शहर बसवर दगडफेक तसेच प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये पेट्रोल भरून त्यास आग लावून बसवर फेकणा-या संशयितांची ओळख पटली आहे़ संशयित वैभव भगवान पगारे (२२, रा. वृंदावननगर, म्हसरूळ), शुभम काशीनाथ भुजबळ (२६, रा. सिद्धार्थ चौक, सातपूर, नाशिक), राहुल सुरेश भडांगे (२६, रा. स्वारबाबानगर, सातपूर, नाशिक), विकी गांगुर्डे (रा. सातपूर) व त्यांच्या साथीदारांचा या कृत्यामध्ये समावेश असून, यापैकी पगारे, भुजबळ व भडांगे यांना पोलिसांनी अटक केली आहे़
सरकारवाडा पोलीस ठाण्यात बसचालक अशोक खंडेराव गायकवाड (मु. पो. आंबे वरखेडा, ता़ दिंडोरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी (दि. १०) सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास बस (एमएच १५ एके ८०१९) म्हसरूळला प्रवासी घेऊन जात होते़ बस जिल्हा न्यायालयाच्या बस स्टॉपवर आली असता अचानक आठ ते दहा संशयित आले. भिडे गुरुजीला अटक करा, असे मोठमोठ्याने म्हणून आरडाओरड केली व बसच्या पुढील काचेवर दगडफेक केली़ यानंतर संशयितांनी बाटलीत आणलेले पेट्रोल बसच्या चाकावर ओतून ती पेटविण्याचा प्रयत्न केला. तसेच मागील दरवाजाच्या काचेवर दगड व अंडी फेकून बसच्या काचा फोडल्या़
या संशयितांनी केलेल्या दगडफेकीमध्ये बसचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले असून, प्रवाशांच्या जिवालाही धोका निर्माण झाला होता़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित पगारे, भुजबळ, भडांगे, गांगुर्डे व त्यांचा साथीदारांचा शोध घेऊन ओळख पटविली़ पोलिसांनी संशयितांपैकी तिघांना अटक केली असून, उर्वरित साथीदारांचा शोध सुरू आहे.