संजय शहाणे लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोधक पथकाने वडाळा गावातील घोड्याच्या तबेल्यालगत सुमारे १७ लाख रुपयाचा जायका १०००० रुपये कंपनीचा गुटखा जप्त केला आहे. महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना आढळून आल्याने इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात पोलिसांनी रोशन शेख, मोहम्मद गुफरान खान, शोएब पटेल या तिघा संशयितांना अटक केली आहे.
इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्यायदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी (दि.४) रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास वडाळा गावातील घोड्याच्या तबेल्यालगत सहायक पोलिस निरीक्षक निखिल बोंडे, मुश्रीफ शेख, सागर परदेशी, किशोर खरोटे, युवराज पाटील, योगेश जाधव, प्रभाकर पवार, सौरभ माळी, प्रकाश नागरे यांनी कारवाई केली. यावेळी घटनास्थळी सालाला रो हाऊसच्या पाठीमागे जायका दहा हजार कंपनीच्या गुटख्याचे पाकीट असलेल्या गोण्यांची ढीग दिसून आले.
पोलिसांनी या ठिकाणी आढळून आलेल्या रोशन अन्वर शेख ( २८ रा. वडाळगाव) याच्याकडे चौकशी केली. त्यात पोलिसांना आढळलेला गुटखा संशयित असद जाकीर सैय्यद याचा असून सैय्यद याने तो रोशन शेख व मोहम्मद गुफरान खान (रा. आलिशान सोसायटी वडाळा गाव), शोएब इक्बाल पटेल (३३) या तिघांनी मिळून फेकून दिल्याचे सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना गुटखा आढळून आल्याने या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघा संशयितांना अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित रोशन शेख, मोहम्मद गुफरान खान, शोएब पटेल, या तिघांना अटक केली आहे. मात्र मुख्य संशयित असद जाकीर सैय्यद हा अजूनही फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.