नाशिक : शहरातील आरोेग्य व्यवस्थेच्या अचानक आॅन द स्पॉट जाऊन करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत महापालिका प्रशासनाला मोठ्या प्रमाणात अनागोंदी आढळल्याने त्यावर जम्बो कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार बोगस कर्मचारी काम करताना आढळल्याप्रकरणी संबंधित कर्मचाºयाबरोबरच दोन स्वच्छता निरीक्षकांना निलंबनाच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. सहा विभागीय निरीक्षकांनाही कारणे दाखवा नोटिसा बजवण्यात आल्या आहेत तर विनापरवनगी गैरहजर राहणाºया १६० कर्मचाºयांना नोटिसा बजावतानाच त्यांचे एक दिवसाचे वेतनही कापण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने सहायक आरोग्याधिकारी तथा उपआयुक्त डॉ. सचिन हिरे, तसेच सर्व विभागीय अधिकारी यांना आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या स्वाक्षरीच्या कारणे दाखवा नोटिसा बजावल्या जाणार आहेत.शहरातील रोगराईच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्थेवर सातत्याने टीका होत होती. विशेषत: गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत नगरसेवकांनी प्रशासनाची पिसे काढली होती. त्यामुळे मंगळवारी (दि.१३) महापालिकेच्या सर्व खाते प्रमुखांसह अन्य अधिकाºयांना प्रभागात अचानक भेट देण्याचा प्रयोग राबविण्यात आला. सकाळी सहा ते सात या वेळात किती कर्मचारी आले तसेच स्वच्छता केली किंवा नाही यासाठी सर्व सफाई कामगारांच्या हजेरी शेडला भेटी देण्यात आल्या यावेळी सुमारे महापालिकेच्या एकूण सफाई कामगारांच्या संख्येच्या तुलनेत २५ टक्के कर्मचारी गैरहजर असल्याचे प्रशासनाला आढळले होते. १६० कर्मचारी विनापरवाना गैरहजर होते तर २०७ कर्मचारी हे पूर्वपरवानगीने रजेवर होते. प्रभाग क्रमांक २३ मध्ये तर एका कर्मचाºयाच्या जागेवर बोगस कर्मचारी काम करताना आढळला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशानुसार कारवाईचा धडाका सुरू झाला.आरोग्याधिका-यांना नोटीसमहापालिकेचे सहायक आरोग्याधिकारी तथा उपआयुक्त डॉ. सचिन हिरे यांच्याकडून कनिष्ठ कर्मचाºयांवर जम्बो कारवाई करण्यात आली असली तरी डॉ. हिरे यांनाही नोटीस बजावली जाणार आहे. आरोग्य विभागाचे प्रमुख असल्याने त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
तीन निलंबित, १६० गैरहजर कर्मचाऱ्यांना बजावल्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:53 AM