नाशिक : शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आॅनलाइन अर्जांची पहिल्या टप्प्यातील सोडत सोमवारी (दि.६) शासकीय कन्या विद्यालयात काढण्यात आली. यात एकूण ६ हजार ६१५ प्राप्त अर्जांपैकी ३ हजार १३७ अर्जांची निवड झाली असून, या सोडतीची माहिती पालकांना एसएमएसद्वारे कळविण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १५ मार्चपर्यंत प्रवेशाची संधी मिळालेल्या शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. तर उर्वरित विद्यार्थ्यांसाठी २० मार्चला दुसऱ्या टप्प्यातील सोडत काढली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील सोडत प्रक्रिया जिल्हा परिषदेचे उपशिक्षण अधिकारी राजीव म्हसकर व शिक्षण विस्तार अधिकारी धनंजय कोळी यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यांना इमरान सुल्तान यांनी तंत्रसाहाय्य केले, तर मनपा प्रतिनिधी जयंत शिंदे यांनी माहिती संकलन केले. यावेळी सोडत प्रक्रियेच्या माध्यमातून निवड झालेल्या पालकांनी दिनांक ६ ते १५ मार्च या कालावधीत शाळेत जाऊन प्रवेश घेण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. शिक्षण हक्क प्रवेशासाठी एकापेक्षा अधिक शाळांध्ये जागा मिळालेल्या पाल्यांच्या पालकांनी पसंतीच्या कोणत्याही एकाच शाळेत प्रवेश घेण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या असून, शाळांनीही पालकांना अन्य शाळेत कागदपत्र दिली किंवा कसे याविषयी विचारणा करण्याचे निर्देश संबंधित शाळांना करण्यात आले आहे. तसेच अॅडमिट कार्डसोबत प्रवेश अर्जात दावा केलेल्या माहितीच्या पडताळणीसाठी सर्व आवश्यक कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रति शाळेत सादर करणे अनिवार्य असून, दिलेल्या मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित प्रवेश रद्द समजून अशा विद्यार्थ्यांचा पुढील फेरीसाठीही विचार केला जाणार नाही. प्रवेशासाठी आवश्यक त्या सर्व दस्तऐवजांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)
शिक्षण हक्क अंतर्गत पहिल्या टप्प्यात तीन हजार प्रवेश
By admin | Published: March 07, 2017 2:16 AM