नाशिक : राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाविरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने सोमवार (दि.१५) पासून दोन दिवसीय संपाला सुुरुवात झाली असून नाशिक जिल्ह्यातील सुमारे तीन हजारांहून अधिक कर्मचारी या संपात सहभागी झाले आहे. तर विविध बँकांच्या जवळपास साडेतीनशेहून अधिक शाखा बंद राहणार आहे. त्यामुळे शनिवार, रविवारच्या सुटीनंतर सोमवार, मंगळवार हा संप असल्याने सलग चार दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार असून बँकिंग व्यवहार ठप्प झाल्याने ग्राहकांना आर्थिक व्यवहारांमध्ये विविध अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
'यूएफबीयू' ही बँक कर्मचारी संघटनांची शिखर संस्था असून ए.आय.बी.इ.ए , एआयबीओसी, एन.सी.बी.इ , ए.आय.बी.ओ.ए , बीईएफआय, ईएनबीआएफ, आयएनबीओसी, एन.ओ.बी.डब्ल्यू आणि एनओबीओ या नऊ संघटनांनी युनायटेड फोरम ऑफ बँक या संघटनेच्या नेतृत्वात १५ आणि १६ मार्च रोजी संपाची हाक दिली आहे. या संपात देशभातील सर्व नऊ बँक कामगार संघटनांचा समावेश बँकांचे कामकाज दोन दिवस ठप्प होणार आहे. 'सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करण्यात आले, तर खेड्यातले बँकिंग आकुंचित होईल. शेतीला कर्जपुरवठा मिळणार नाही; कारण खासगी बँका जिथे नफा आहे, तेथेच बँकिंग करतात, अशी प्रतिक्रिया संपात सहभागी बँक कर्मचाऱ्यांमध्ये उमटत आहे. तसेच 'सार्वजनिक बँकांचे खासगीकरण झाल्यास या बँका उर्वरित भागातून काढता पाय घेतील. मग त्या भागात बँकिंग सेवा कशी पुरवणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच काही अपवाद सोडले, तर आज जिल्हा सहकारी बँका कोलमडल्या आहेत. प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या जवळची साधनसामग्री मर्यादित आहे. खासगीकरण झाल्यास ग्रामीण जनता पुन्हा सावकार किंवा आधुनिक सावकारांच्या दरवाजात उभे राहण्याची वेळ येईल,असा इशाराही बँक कर्मचारी संघटनांनी दिला आहे .
दोन बँकांचे खासगीकरण होणार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर करताना देशातील दोन बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली होती. देशात सध्या १२ सरकारी बँक आहेत. यापैकी दोन बँकांचे खासगीकरण केले तर देशात फक्त दहा बँक सरकारी राहतील. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षात १४ सार्वजनिक बँकांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्याचे बँक संघटनांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात येत आहे. तर बुधवारी एलआयसी (१७) आणि गुरुवारी (दि.१८) कर्मचारी संघटनांही संप पुकारला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.