नाशिक : महापालिकेच्या बिटको रुग्णालयात आठ दिवसांपासून खोकल्याच्या औषधांची टंचाई आणि केवळ स्वाइन फ्लूसाठी लागणाºया गोळ्यांची अवघी चार पाकिटे अशा स्थितीत महापालिकेच्या रुग्णालयांमध्येच आणीबाणीची स्थिती असल्याचे लोकप्रतिनिधींच्या झाडाझडतीत निदर्शनास आल्यानंतर आता प्रशासनाने चोवीस तासांत सुधारणा केल्या असून, वैद्यकीय अधीक्षकांनी सर्व डॉक्टरांना वेळेचे नियोजन करून दिले आहेत. त्याचप्रमाणे टॅमी फ्लूच्या गोळ्यांचा साठा वाढविण्यात आला असून, तीन हजार गोळ्या सध्या उपलब्ध आहेत.महापौर रंजना भानसी यांनी ‘महापौर तुमच्या दारी’ उपक्रम सुरू करून पहिल्याच दिवशी सिन्नर फाटा रुग्णालयात भेट दिली आणि प्रशासनाचे पितळ उघडे पाडले. रुग्णालयात शस्त्रक्रिया कक्षात गाद्या पडून होत्या तसेच अन्य समस्या होत्या, तर शिवसेनेच्या वतीने बिटको रुग्णालयात भेट दिली त्यावेळी तेथे आठ दिवसांपासून खोकल्याची औषधे संपल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले आणि नंतर साठा उपलब्ध असल्याचे आढळले. महापालिकेच्या सर्वात मोठ्या असलेल्या बिटको रुग्णालयात स्वाइन फ्लूवरील उपचारासाठी लागणाºया टॅमी फ्लूच्या गोळ्यांची अवघी चार पाकिटे म्हणजे चाळीस गोळ्या शिल्लक असल्याचे आढळले होते.वैद्यकीय अधीक्षक डॉ. गायकवाड यांनी या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर औषधांचा साठा तपासला आणि आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून साठा मागवून घेण्यात आला असून, एकूण तीन हजार टॅमी फ्ल्यूच्या गोळ्या उपलब्ध आहेत. याशिवाय अन्य औषधांचा पुरेसा साठा असल्याचे त्यांनी सांगितले. खोकल्याच्या औषधे बिटको रुग्णालयात पुरेसा साठा असून, नगरसेवकांनी ज्या कर्मचाºयाकडे चौकशी केली त्याला याबाबत माहिती नव्हती, असे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या बाह्या रुग्ण तपासणीच्या वेळापत्रकासह सर्व प्रकारच्या ड्युटी अवर्सविषयी सर्व रुग्णालयांना अवगत करण्यात आले असून, ओपीडीच्या वेळात अन्य क्षेत्रीय कामांना किंवा अन्यत्र कोठेही जाऊ नये अशाप्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सहाही विभागांत रक्त, लघवीची तपासणीडेंग्यू आणि स्वाइन फ्लूच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाच विभागांतील मनपा रुग्णालयात रक्त, लघवी तपासणीची व्यवस्था उपलब्ध असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली. नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय, पंचवटीत इंदिरा गांधी रुग्णालय, कथडा येथील झाकीर हुसेन, सिडकोत श्री स्वामी समर्थ तर सातपूर येथे मायको रुग्णालयात ही व्यवस्था आहे. महापौर रंजना भानसी यांनी सहाही विभागांत चोवीस तासांत रक्त, लघवी तपासणी लॅब सुरू करण्याचे आदेश दिले होते.