नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि. १५) एकूण २८ कोरोनामुक्त तर ७७ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. मुक्तीच्या तुलनेत बाधितांची संख्या जवळपास तिप्पट असण्यामागे प्रलंबित अहवालांची वाढलेली संख्या कारणीभूत ठरली आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कोरोनामुक्तीच्या तुलनेत गत दोन महिन्यात बहुतांश वेळा कमीच आली होती. मात्र, १० डिसेंबरला २७ नागरिक कोरोना बाधित तर ४६ कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर पुन्हा पाच दिवसांनी म्हणजे १५ डिसेंबरला पुन्हा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. बुधवारी बाधित आढळून आलेल्या ७७ रुग्णांपैकी ४२ नाशिक मनपा क्षेत्रातील , नाशिक ग्रामीणचे ३३ तर जिल्हाबाह्य २ नागरिकांचा त्यात समावेश आहे. दरम्यान कोरोना बाधित खूप अधिक आढळल्याने जिल्ह्यातील कोरोना उपचारार्थ रुग्णसंख्या साडेतीनशेपेक्षा कमी असताना पुन्हा चारशेपार जाऊन ४०१ वर पोहोचली आहे. दरम्यान जिल्ह्यातील तब्बल १८७७ कोरोना अहवाल प्रलंबित असून त्यात सर्वाधिक १४४७ नाशिक ग्रामीण, २९५ नाशिक मनपा, १३५ मालेगाव मनपाचे आहेत.
इन्फो
‘त्या’ नागरिकांचे नमुने पुण्याला
आफ्रिकेतील माली देशातून परतलेला आणि बाधित आढळलेल्या नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. तो अहवाल मिळण्यासाठी किमान दोन आठवड्यांहून अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत संबंधित रुग्णावर कोरोनाचे नियमित उपचार करुन योग्य ती दक्षता घेण्यात येणार आहे.