नाशिक : नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द शिवारात काही अट्टल गुन्हेगार दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईप्रसंगी पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. यानंतर पोलिसांनी पाचपैकी तीन संशयिताना अटक केली आहे. अटक केलेले सर्वजण हे नगर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार आहेत. नांदगाव पोलीस ठाणे हद्दीतील जळगाव खुर्द शिवारात काही सराईत दरोडेखोर वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती नांदगाव पोलिसांना मिळाली होती. त्यांना पकडण्यासाठी नांदगावचे पोलीस निरीक्षक बशीर शेख व त्यांच्या सहकाºयांनी जळगाव खुर्द शिवारात सापळा रचला. पोलीस मागावर असल्याचे कळताच सदर दरोडेखोर शिऊर बंगला रोडने पळू लागले. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून दोन संशयितांना अटक केली. तसेच दरोडा टाकण्याचे साहित्य व नंबर प्लेट नसलेली पल्सर मोटारसायकलही जप्त केली. येथून पळून गेलेल्या अन्य दरोडेखोरांच्या मागावर पोलीस असताना माणिकपुंज धरणाच्या दिशेने एक संशयित दुचाकीने जात होता. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता त्याने पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. पुन्हा एकदा त्याने गोळीबार केल्यावर पोलीस निरीक्षक शेख यांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी सदर दरोडेखोरास हीरोहोंडा स्प्लेंडर (क्र. एमएच १७ बीके १४७९) या दुचाकीसह ताब्यात घेतले. अन्य दोन दरोडेखोर मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले. नांदगाव पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये दीपक अंबादास पोकळे (२५), रा. लोहारे, ता. राहाता, रामनाथ गोरख मोरे (२५), रा. पिंपळवाडी, ता. राहाता आणि अनिल ज्ञानेश्वर शिंदे (१९), रा. पुणतांबे, ता. राहाता, जि. नगर यांचा समावेश आहे. हे सर्वजण सराईत गुन्हेगार असून, अहमदनगर पोलीस बºयाच दिवसांपासून त्यांचा शोध घेत आहे. नगर पोलिसांनी या आरोपींविरुद्ध मकोकाअंतर्गत कारवाई केलेली आहे. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन आरोपी व त्यांच्या अन्य साथीदारांविरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९९, ३०७, ३५३, भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून दरोड्याचे साहित्य, मिरची पूड, चाकू, कटावणीसह स्क्रू ड्रायव्हर, एक पल्सर व एक स्प्लेंडर अशा दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती समजताच पोलीस अधीक्षक संजय दराडे, मालेगाव अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, मालेगाव शहर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, निफाडचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिºहे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांनी घटनास्थळी धाव घेतली व मार्गदर्शन केले.
दरोड्याच्या तयारीत असलेले तीन अट्टल गुन्हेगार अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 1:39 AM