---
ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्येत वाढ
चांदवड : तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन दिवसात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांनी दिली. वडाळीभोई, बहादुरी, कानमंडाळे, देवगाव, हिवरखेडे, देणेवाडी, भुत्याणे या गावांमध्ये दोन दिवसात सतरा रुग्ण चांदवड येथील डीसीएससी केंद्रात दाखल झाले आहेत. त्यात एकाच दिवशी दहा रुग्ण दाखल झाले. अशा प्रकारे रुग्णसंख्या वाढणे म्हणजे संबंधित गाव हॉटस्पॉट बनण्याचे संकेत आहे. तसेच यापुढे तिसरी लाट येण्याचे लक्षणे आहेत. संबंधित गावांमधील ग्रामसेवकांनी कंटेन्मेन्ट झोन तयार करून कडक अंमलबजावणी करावी, प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात जेणेकरून कोविडची साथ आटोक्यात येईल, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
---
चांदवडला पोलीसपाटील बैठक
चांदवड : येथील पोलीस स्टेशनमध्ये पोलीसपाटलांची बैठक पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यात आगामी बकरी ईद व इतर सणांबाबत योग्य त्या सूचना देण्यात आला. ग्रामीण भागात जनावरे चोरीच्या घटना वाढल्या असून, गावात सर्तकता बाळगावी व त्वरित चांदवड पोलीस स्टेशनला संपर्क करावा, असे सांगण्यात आले.