नाशिक : पंचवटी आगाराच्या शहर बसने सातपूर गावातून भरधाव नाशिककडे येताना सातपूरच्या मनपा विभागीय कार्यालयापासून पुढे काही अंतरावर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. यामुळे बंद ट्रॅक्टर पंधरा फुटांपर्यंत वेगाने जाऊन डाव्या बाजूला असलेल्या मूर्तिकाराच्या झोपडीच्या आवारात शिरला. दुभाजक स्वच्छता करणाऱ्या तीन महिला मजूर या भीषण अपघातात गंभीरपणे जखमी झाल्या आहेत. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, सातपूरकडून नाशिकच्या दिशेने जाणाºया भरधाव बसवरील (एम.एच.१२ ई.एफ ६६१८) चालकाचे नियंत्रण सुटल्याने सोमवारी (दि.२३) संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या दुभाजकाला लागून उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर पाठीमागून बस जाऊन आदळली. धडक एवढी भीषण होती की ट्रॅक्टर बंद अवस्थेत असूनही पुढे पंधरा फूट अंतरावर जाऊन रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या मूर्तिकाराच्या झोपडीच्या आवारात शिरला. सुदैवाने झोपडीपुढे झाड व मोठे दगड असल्यामुळे ट्रॅक्टर-ट्रॉली अडकल्याने झोपडीपासून अवघ्या पाच फूट अंतरावर ट्रॅक्टर थांबला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. कारण झोपडीमध्ये गीताबाई आपल्या मुलांसोबत झोपलेल्या होत्या. मोठा आवाज झाल्याने त्या बाहेर येताच झोपडीपुढे ट्रॅक्टर झाडावर आदळल्याचे बघून त्यादेखील भेदरल्या. नशीब बलवत्तर असल्यामुळे आपल बचावलो, अशी प्रतिक्रिया गीताबाई यांनी व्यक्त केली. या भीषण अपघातात दुभाजक स्वच्छतेचे काम करणाºया दुडगाव-महिरावणी येथील रहिवासी महिला मजूर वंदना समाधान साळवे (२८), राधा मच्छिंद्र साळवे (२९), सुगंधा महेंद्र साळवे (३२) या गंभीर जखमी झाल्या आहेत. राधाबाई यांना या अपघातात पाय गमवावे लागले असून, प्रकृती चिंताजनक आहे.महिलांवर एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.निष्काळजीपणा भोवलाबसचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करता वेगमर्यादेचे उल्लंघन करून भरधावपणे बस दामटविण्याचा निष्काळजीपणा केला, तसेच भर वाहतुकीच्या रस्त्यावर स्वच्छतेची कामे करताना संबंधित ठेकेदाराने वाहनचालकांना त्याची कल्पना मिळावी, यासाठी कुठल्याही प्रकारे बॅरिकेड, सूचना फलक किंवा रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘सुरक्षा अडथळे’ही उभारलेले नव्हते. एकूणच बसचालकाचा निष्काळजीपणा व मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळाले. हाकेच्या अंतरावर सातपूर पोलीस ठाणे असूनही घटनास्थळावरून बसचालकाने पोलीस ठाण्यात न जाता पलायन क रणे पसंत केले.महामंडळ देणार आर्थिक मदतअपघात अत्यंत दुर्दैवी आहे. जखमी महिला मजुरांना तरतुदीनुसार निश्चितपणे राज्य परिवहन महामंडळाकडून आर्थिक मदतीचा हात दिला जाईल. अपघातानंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात बसचालक आर. सी. आवारे हा प्रथम हजर झाला होता. बस त्र्यंबकेश्वरकडून सातपूरमार्गे नाशिकला येत होती. बसमध्ये असलेले प्रवासी सुखरूप असून महिला वाहकाला किरकोळ दुखापत झाली. चालकाने कुठल्याहीप्रकारची नशा केलेली नव्हती. - शुभांगी शिरसाठ, आगार व्यवस्थापक, पंचवटी
बसच्या धडकेत तीन महिला गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:19 AM