नाशिक : पेठ रोडवरील एका घरात सराईत गुन्हेगाराने बळजबरीने बंद दरवाजा तोडून प्रवेश करीत एका महिलेला कोयता दाखवून धमकावत तिच्याकडे पैशांची मागणी केली. महिलेने पैसे देण्यास नकार दिला असता गुंडाने तिच्या अंगावरील कपडे ओढून विनयभंग केला. घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने पुन्हा एका भाजी विक्रेत्या महिलेसह दुसऱ्या एका महिलेला शिवीगाळ करीत धमकावून पैसे मागत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेवरून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे बोलले जात आहे.
पोलिसांच्या यादीवरील संशयित सराईत गुन्हेगार अनिल दत्तू पवार ऊर्फ अण्या सांड (रा. सुदर्शन कॉलनी, पेठरोड) याने पीडितेच्या फिर्यादीनुसार रविवारी (दि.३) संध्याकाळी तिच्या राहत्या घरी येऊन घराचा दरवाजा तोडत बळजबरीने घरात प्रवेश केला. मुलाला शिवीगाळ व मारहाण करीत कोयत्याचा धाक दाखवून विनयभंग केल्याची तक्रार पीडितेने केली आहे. त्यानंतर घराबाहेर जाऊन हातगाडीवर भाजी विक्री करणाऱ्या महिलेकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. या महिलेने पैसे देण्यास नकार दिल्याने संशयिताने तिचाही विनयभंग करीत आणखी एका महिलेकडे पैसे मागितले. तिने पैसे देण्यास नकार दिल्याने संशयित अनिल याने तिला शिवीगाळ करीत तिच्या दुकानाचे नुकसान करीत तिचे कपडे फाडले. त्यानंतर ‘माझी परिसरात दहशत आहे, पोलिसांकडे तक्रार केल्यास जिवे ठार मारीन’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित अण्या सांडविरुद्ध विनयभंग, शिवीगाळ, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी तक्रारीची तत्काळ दखल घेत संशयित सराईत गुन्हेगार अण्या सांड यास बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या विरोधात यापूर्वी मारहाण, जबरी चोरी, खून, खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.