नाशिकरोड : कोरोनाच्या लॉकडाउनमुळे विविध राज्यांतील अडकून पडलेल्या कामगार व परप्रांतीयांना आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सोमवार (दि. १) पासून देशभरात एकूण दोनशे स्पेशल रेल्वे धावण्यास सुरुवात झाल्या असून, त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले नाशिकरोड रेल्वेस्थानक सोमवारी प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेले. दिवसभरातून तीन प्रवासी रेल्वेस्थानकातून धावल्या.रेल्वे प्रशासनाकडून देशभरात सोमवारपासून सोडण्यात आलेल्या २०० स्पेशल रेल्वेपैकी येणाऱ्या व जाणाºया एकूण २२ स्पेशल रेल्वे नाशिकरोड रेल्वेस्थानकात थांबणार आहेत. ज्या प्रवाशांनी अगोदरच स्पेशल रेल्वे तिकिटाचे आरक्षण केले आहे त्यांनाच स्थानकात सोडण्यात येत असून, उर्वरित रेल्वेस्थानकाचे सर्व मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. प्रवेशद्वारावर रेल्वेबरोबरच बिटको हास्पिटलचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी हजर होते. त्यांनी प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून प्रवासासाठी रेल्वे स्थानकात सोडले, तर परराज्यांतून नाशिकला येणाºया प्रवाशांची आरोग्य तपासणी करून व त्यांचे नाव, पत्ता आदी माहिती घेण्यात येत आहे. सोमवारी पहाटे महानगरी एक्स्प्रेस नाशिकरोड रेल्वेस्थानकात थांबून प्रवाशांना घेऊन रवाना झाली. त्यानंतर दुपारी ४ वाजता पवन व कामायनी या रेल्वेमधून प्रवासी रवाना झाले. तसेच नाशिकरोडहून रेल्वेने जाणाºया प्रवाशांना गाडीच्या दीड तास आधी स्थानकात यावे लागले. त्यांना थर्मल स्क्रिनिंग सक्तीची होती. सोमवार पासून सुरू झालेल्या या रेल्वेस्थानक प्रबंधक आर. के. कुठार, वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा आदींच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुरू आहे. आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक एन. व्ही. गुहिलोत, सहायक निरीक्षक डी. पी. झगडे, रेल्वे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेस्थानक प्रवेशद्वार, प्लॅटफॉर्म व मालधक्का आणि देवीचौकातील पुलाखालीही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.-----------------------------प्रत्येक रेल्वेगाडी गेल्यानंतर पाण्याचे नळ, बाकडे, प्लॅटफार्म, वेटिंग रुम आदी ठिकाणी सॅनिटाइज करण्यात आले. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, प्रतिकारशक्ती कमी असलेले लोक, गर्भवती महिला, दहा आणि त्याखालील मुले, ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी प्रवास करणे टाळावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.
तीन श्रमिक रेल्वे धावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 10:20 PM