नाशिक : धुळे येथील अवसायनात निघालेल्या पतपेढीत अडकलेली रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची मागणी करून पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेले सहायक निबंधक व प्रशासक प्रकाश हिरालाल भामरे (६४, जोगई बंगला, टेलिफोन कॉलनी, देवपूर, धुळे) यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे़ या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूररोड परिसरातील मेडिकल दुकानदार व तक्रारदार मयूर अलई यांचे वडील प्रकाश अलई यांनी धुळे येथील पंडितरत्न स्वर्गीय कन्हैयालाल मसा नागरी पतपेढीत आई, दोन बहिणी व स्वत:च्या नावे २ लाख ७५ हजार रुपये मुदतठेवीमध्ये ठेवले होते़; मात्र मुदत पूर्ण होण्यापूर्वीच पतपेढी अवसायनात निघाल्याने तिच्यावर प्रशासक म्हणून प्रकाश भामरे यांची नियुक्ती झाली़या पतपेढीत अडकलेल्या रकमेबाबत अलई यांनी भामरेंशी संपर्क साधला असता त्यांनी रक्कम काढून देण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपयांची मागणी केली़ तसेच २० हजार रुपयांचा धनादेश देऊन जोपर्यंत लाचेची रक्कम मिळत नाही तोपर्यंत धनादेश वटणार नाही अशी तजवीजही केली़ अलई यांनी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर २५ जानेवारी २०१० रोजी ठक्कर बाजारमध्ये सापळा लावण्यात आला़़ भामरे यांनी अलई यांच्याकडून पंधरा हजार रुपये घेताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले़ (प्रतिनिधी)
सहायक निबंधकाला तीन वर्षे सक्तमजुरी
By admin | Published: December 02, 2015 11:02 PM