नाशिक : कोरोनाचे संक्रमण सुरू असून धरण, धबधबे, ओहोळाच्या परिसरात वर्षा सहलीसाठी जाण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीदेखील शनिवारी (दि.१८) सिडको, पाथर्डीफाटा भागातील चौघे मित्र पर्यटनासाठी वाडीव-हे भागातील रायगडनगर येथील वालदेवी धरणाच्या परिसरात गेले. यावेळी पोहण्याचा मोह आवरता आला नसल्याने एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात तीघेही पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडल्याची दुर्घटना घडली. चौथा मित्र पाण्यात न उतरल्याने तो वाचला. मयतांमध्ये मुंबई येथील एका पोलीस शिपायाचाही समावेश असल्याचे वाडीव-हे पोलिसांनी सांगितले.याबाबत अधिक माहिती अशी, मंगेश बाळासाहेब बागुल (३३ रा.पाथर्डीफाटा, नेमणूक मुंबई पोलीस दल), वैभव नानाभाऊ पवार (२६,रा. उत्तमनगर, सिडको), महेश रमेश लाळगे (२३, महाकाली चौक, सिडको) व गणेश जाधव (२९,रा. सिडको) हे चौघे मित्र वाडीव-हे पोलीस ठाणे हद्दीतील रायगडनगरजवळील जाधवनगरी येथे वालदेवी धरण परिसरात फिरण्यासाठी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गेले होते. यावेळी तीघांपैकी एकाने सुरूवातीला धरणात पोहण्यास सूर फेकला; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. त्यामुळे दुसऱ्या मित्राने त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे गटांगळ्या खाऊ लागल्याचे लक्षात येताच तीस-यानेही पाण्यात उडी घेतली; मात्र दुर्दैवाने तीघेही पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडले. याबाबतची माहिती गणेशने आरडाओरड केल्याने पिंपळद घोलपाचे पोलीस पाटील यांनी तत्काळ पोलिसांना माहिती कळविली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक विश्वजीत जाधव हे पथकासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी आजूबाजूच्या गावकऱ्यांच्या मदतीने व पोहण्यात तरबेज असलेल्या युवकांच्या मदतीने तीघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकिय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. याप्रकरणी वाडीव-हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सिडकोतील दोघांसह पाथर्डीफाटा येथील एका पोलीसाचा या दुर्घटनेत बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.