नाशिक : इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिप अर्थात आयएनआरसीची दुसरी फेरी नाशिकला होत आहे. वेस्टर्न इंडिया स्पोर्ट्स इंडिया (विसा)तर्फे ३१ मे ते २ जून या कालावधीत रॅली ऑफ महाराष्ट्र (ब्लू बँड एफएमएससीआय फोर व्हिलर आयएनआरसी २०२४) जिल्ह्यातील त्र्यंबक ते जव्हारपर्यंतच्या परिसरात होणार आहे. ८ वर्षांनंतर विसा या संस्थेला आयोजनाचा मान मिळाला असून, तब्बल ५० हून अधिक स्पर्धक त्यात सहभागी होणार असल्याची माहिती स्पर्धेचे सीओसी अश्विन पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फेडरेशन ऑफ मोटार स्पाेर्ट्स इंडिया (एफएमएससीआय) मान्यतेने या स्पर्धेचा प्रारंभ शुक्रवारी (दि. ३१ मे) त्र्यंबक रोडवरील ग्रेप काैंटी रिसॉर्ट येथे सायंकाळी ४:५६ वाजता होणार आहे. त्याआधी प्रत्यक्ष रॅलीला सुरुवात होण्यापूर्वी नाशिकमध्ये २७ मेपासूनच स्पर्धकांच्या गाड्या दाखल होणार आहेत. ग्रेप काैंटी हे रॅलीचे मुख्यालय ठेवण्यात आले असून, सपकाळ नॉलेजच्या ठिकाणी सर्व गाड्यांचे सर्व्हिस पार्क असेल. ३० मे या दिवशी वाहनांची कागदपत्र तपासणी, चालक-सहचालकांसाठी सूचना देणे, मार्गाची पाहणी करणे, प्रशिक्षण यासारखे कामकाज चालणार आहे.
३१ मे या दिवशी ग्रेप काैंटीमध्ये ४.५६ वाजता छोट्या रॅलीचा थरार अर्थात रंगीत तालीम रंगणार आहे. त्यानंतर त्र्यंबकेश्वर, मोरचुंडी, निळमाती, घोडीपाडा, पोशेरा, करोली, हिरवेपडा, मोखाडा यासारख्या ग्रामीण भागातील अवघड वळणदार रस्त्यांवरून रॅली रंगणार असल्याचे पंडित यांनी नमूद केले. १ आणि २ जूनला होणाऱ्या स्पर्धेचा मार्ग आणि वेळा पाहण्यासाठी आपण wisa.org.in या संकेतस्थळावर संपर्क करू शकतात. रॅलीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यंदा महिला स्पर्धेच्या जोड्याही सहभागी होत असल्याचे प्रेम काशीनाथ यांनी सांगितले.