पंचवटी : शहर व परिसरात जबरी चोरीच्या घटना थांबता थांबत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. पंचवटीत मित्रासमवेत दुचाकीवरून जाणाऱ्या इसमाच्या डोळ्यांवर मिरची पूड फेकून त्यांना मारहाण करत इसमाजवळील रोकड, गळ्यातील सोनसाखळी, अंगठी काढून टोळक्याने पोबारा केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.८) सकाळी दिवसाच्या पहिल्या प्रहरी घडल्याने संताप व्यक्त होत आहे. यामुळे पंचवटी पोलीस ठाण्याची सुत्रे नव्याने हाती घेतलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपुढे जबरी चोरी, दुचाकी चोरी, घरफोडीसारखे गुन्हे थांबविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.पेठरोडवरील कर्णनगर परिसरात सुनील पवार (४२) हे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत रविवारी सकाळी दुचाकीवरून युगंधर चौकातून मार्गस्थ होत होते. यावेळी संशयित नितीन धोत्रे, संतोष पवार, शंकर पवार, दीपक धोत्रे, कैलास येवले, पिंटू येवले या टोळक्याने पवार यांच्या दिशेने मिरचीची पूड भिरकावली. डोळ्यांत मिरची गेल्यामुळे त्यांनी तत्काळ दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबविली. यावेळी टोळक्याने त्यांना लोखंडी रॉडने भर रस्त्यात दिवसाढवळ्या मारहाण करण्यास सुरुवात केली. काहींनी त्यांच्या अंगावर दगडफेकदेखील केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पवार यांच्या खिशातील दहा हजारांचा सॅमसंगचा स्मार्ट मोबाइल, गळ्यातील सोन्याची साखळी, हातातील अंगठी असा ऐवज घेऊन टोळक्याने धूम ठोकली. या घटनेमुळे पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत पुन्हा गुन्हेगारी फोफावल्याचे बोलले जात आहे.महिलेचे मंगळसूत्र चोरट्याने ओरबाडलेनाशिकरोड येथे विवाह समारंभासाठी आलेल्या महिलेचे सुमारे ७० हजारांचे मंगळसूत्र चोरट्याने ओरबाडून पलायन केले. सुनीता मनोहर सोनार (रा. कळवा, मुंबई) या बहिणीसोबत विवाहसोहळ्यासाठी दत्तमंदिर चौकात त्याचवेळी अचानक समोरून दुचाकीवर दोन युवक आले व त्यांनी सोनार यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून पलायन केले. सोनार यांनी आरडाओरड केला. परंतु चोरटे दुचाकीवर सुसाट वेगाने गेले.
मिरचीपूड फेकून सोनसाखळी हिसकावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:54 AM