नाशिक : महानगरातील कोणत्याही नागरिकांना स्वेटर खरेदी करायचे असतील तर ते सर्वप्रथम तिबेटी मार्केटकडेच वळतात. महानगरात शनिवारी पुन्हा थंडीत वाढ झाल्याने तिबेटीयन मार्केटमध्ये स्वेटर, जॅकेट खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
दिवाळीनंतर शहरातील थंडी खऱ्या अर्थाने वाढू लागली. मात्र, त्यानंतरच्या आठवड्यात पुन्हा थंडी कमी झाल्याने खरेदीसाठी तितकीशी गर्दी झाली नव्हती. मात्र, शुक्रवारी नाशिकचा पारा अकरा अंशावर गेल्यानंतर आता थंडीची वाटचाल एक अंकी आकड्याकडे होण्याच्या शक्यतेने बाजारात पुन्हा गर्दी होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस तिबेटियन मार्केटमधील विक्रेत्यांची दुकाने ग्राहकांनी ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी दिवाळीच्या आधीपासून सुरू होणारी तिबेटीयन मार्केटमधील गर्दी डिसेंबरपर्यंत कायम राहत असे. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील विक्रेत्यांनाही आर्थिक झळ सहन करावी लागली. दिवाळीनंतर एकदम ओसरलेली गर्दी डिसेंबरच्या प्रारंभानंतर काही प्रमाणात पुन्हा वाढू लागली आहे. बाजारपेठ रुळावर येऊ लागली असून, ग्राहकांकडून मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
तिबेटीयन मार्केटमधील बहुतांश दुकानांत ‘नो मास्क, नो एंट्री’चे फलक लावण्यात आले आहेत. तसेच ग्राहकांच्या हातावर सॅनिटायझर देऊनच प्रवेश देण्यात येत आहे. काही ठिकाणी स्क्रीनिंगही केले जात असून, ग्राहकांची पूर्ण दक्षता घेऊनच स्वेटर, जॅकेट विक्रीचे व्यवहार होत आहेत. कोरोनाकाळात बाजारपेठ बंद असल्याने त्याचा येथील विक्रेत्यांना तसेच त्यावर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांनाही फटका सहन करावा लागला. या काळात सर्व विक्रेत्यांचे मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, आता बाजारपेठ हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने तिबेटीयन मार्केटमध्ये चैतन्य पसरू लागले आहे.
इन्फो
स्वेटरसह जॅकेटला मागणी
तिबेटीयन मार्केटमध्ये सर्वाधिक मागणी ही स्वेटर आणि वैविध्यपूर्ण आकर्षक जॅकेटलाच आहे. सामान्यपणे पाचशे रुपयांपासूनचे स्वेटर तर हजार रुपयांपासून आकर्षक जॅकेट्स मिळत आहेत. त्याशिवाय शाल, हॅन्डग्लोज, मफलर, विंड चिटर, हाफ जॅकेट यांनादेखील मोठ्या प्रमाणात मागणी दिसून येत आहे.