नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या पार्सल कार्यालयात प्रवाशाने ठेवलेल्या बॅगमधील घड्याळाचा अलार्म वाजण्यास सुरुवात झाल्याने रेल्वे पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. बॉम्बशोधक-नाशक पथकाने त्या बॅगची तपासणी केल्याने व घड्याळाचा अलार्म वाजत असल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर पार्सल आॅफिस (अमानत घर) असून, तेथे रेल्वेमार्फत येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे सामान भाडेतत्त्वावर ठेवले जाते. मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पी.जी.पी. नायर (पत्ता- जेपी सीमेंट, सतना, मध्य प्रदेश) असे नाव असलेले पार्सल आॅफिसमध्ये नोंद असलेल्या प्रवाशाने आपल्या तीन बॅगा ठेवल्या. आज सकाळी पुन्हा त्या संबंधिताने आणखी दोन बॅगा आणून ठेवल्या.सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पार्सल आॅफिसच्या रॅकमध्ये ठेवलेल्या बॅगेतून टिक टिक आवाज येऊ लागला. सदर प्रकार तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच घटनेची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक बी. डी. इप्पर यांना कळविण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर काही वेळातच बॉम्बशोधक-नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. बॉम्बशोधक-नाशक पथकाचे पोलीस निरीक्षक ए. एम. वाघ, एन. बी. अहेर, ए. पी. चव्हाण, बी. वाय. कासार, बी. एम. देवरे, एम. आर. शिंदे आदिंनी त्या बॅगची तपासणी केली. तब्बल एक-दीड तासाच्या प्रयत्नांनंतर ती बॅग काळजीपूर्वक उघडली असता बॅगेतील घड्याळाचा अलार्म वाजत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पार्सल आॅफिसला दोन्ही बाजूने दरवाजे असून, देवी चौकाकडून येणारे काही प्रवासी पार्सल कार्यालयातून रेल्वेस्थानकात प्रवेश करतात. तसेच नवीन आरक्षण कार्यालयामागून रेल्वेस्थानकात येण्या-जाण्यासाठी जो नवीन रस्ता केला आहे तेथून कोणीही सहजपणे ये-जा करू शकतो. त्यामुळे याठिकाणी रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलीस यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्याची गरज आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकावरच रेल्वेचे हे पार्सल विभाग आहे. त्यामुळे केव्हाही घातपात घडू शकतो अशी शक्यता गृहीत धरून उपाययोजना होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
टिक टिक वाजते बॅगेत...
By admin | Published: January 08, 2015 12:49 AM