नाशिकवाघ आणि बिबट्या या संरक्षित क्षेत्रातील प्राण्यांचे संरक्षण व्हावे यासाठी वने आणि पर्यावरण मंत्रालयाने या प्राण्यांचे वास्तव्य असलेली ठिकाणी गोपनीय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातील वाघ आणि बिबट्यांची आकडेवारी जाहीर केली जाणार असली, तरी त्यांची वास्तव्याची ठिकाणे मात्र जाहीर केली जाणार नाहीत. गेल्यावर्षी वाघांची मोठ्या प्रमाणात शिकार झाली, तर बिबट्यांच्या कातड्याची आणि दात, नखांची तस्करी झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती. या प्राण्यांची हत्त्या करून त्यांच्या अवयवांची तस्करी करणारी एक टोळीही मध्य प्रदेशात हाती लागली होती. यावेळी झालेल्या चौकशीत राज्यातील अनेक भागात अशा प्रकारच्या संघटित टोळ्या कार्यरत असल्याची बाब समोर आली होती. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातही अशाच प्रकारे अनेक बिबट्यांचा गूढ मृत्यू झाल्याचे समोर आले होते. राज्यभर अशा प्रकारे वाघ आणि बिबट्यांची हत्त्या होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वने आणि पर्यावरण मंत्रालयाने याबाबतीत खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०१४ मध्ये देशात सर्वत्र व्याघ्रगणनेचा राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यात आला. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या कार्यक्षेत्रातील बिबटे आणि वाघ यांची माहिती प्रधान वनसंरक्षण कार्यालयांना पाठविली होती. अशी माहिती संकलित करताना जिल्हा कार्यालयाने गोपनीयता बाळगावी, आपल्या क्षेत्रातील बिबट्या, वाघांची संख्या जाहीर करू नये, अशी सक्त ताकीदच देण्यात आली होती. त्यामुळे यंदा प्रथमच व्याघ्रगणनेची जिल्हानिहाय आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. पर्यावरणमंत्र्यांनी नुकतीच देशभरातील वाघांच्या संख्येची माहिती जाहीर केली. त्यानुसार कोणत्या राज्यात किती वाघ आहेत आणि त्यांची संख्या किती वाढली एवढीच माहिती देण्यात आली. परंतु कोणत्या क्षेत्रात आणि जिल्ह्यात ही संख्या आहे याची माहिती कुणालाही देण्यात आलेली नाही. याचप्रमाणे आता बिबट्यांचीही माहिती जाहीर केली जाणार असून, तेव्हाही अशाच प्रकारची गोपनीयता बाळगली जाणार असल्याचे समजते. यापूर्वी प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून वन्यजीव गणनेची माहिती दिली जात होती. यंदा अधिकारीही अनभिज्ञच राहिले.
वाघ, बिबट्या वास्तव्याची गोपनीयता
By admin | Published: January 22, 2015 12:59 AM