महेश गुजराथी
चांदवड : कोरोनाच्या पहिल्या लाटेला आरोग्य विभाग आणि शासनस्तरावर झालेली धावपळ, रुग्णांची संख्या, उपचार, मृत्यूचे प्रमाण यामुळे सगळीकडे हाहाकार उडाला होता. त्यानंतर दुसरी लाट आली, तेव्हा लसीकरण, ऑक्सिजन मिळवणे, यामुळे पुन्हा एकदा शासनाची, आरोग्य विभागाची धावपळ झाली. याच पार्श्वभूमीवर आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्याने या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी व तिच्याशी मुकाबला करण्यासाठी आताच सरकारी यंत्रणा पूर्णपणे तयारीने मैदानात उतरली आहे.तिसऱ्या लाटेला परतवून लावू, असा निर्धार चांदवड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.कोरोनाची चांदवड तालुक्यात पहिली लाट ही मागील वर्षी मार्च महिन्यात आली. त्यात एप्रिल २०२० मध्ये पहिला एक रुग्ण सापडला. त्यानंतर चांदवड तालुक्यात पूर्णपणे लॉकडाऊन झाले. लॉकडाऊन उघडल्यानंतर रुग्णसंख्या वाढण्यापूर्वी तशी संख्या कमी होती. पहिली लाट जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर अशी चार ते पाच महिने राहिली.पहिल्या लाटेत चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या ट्रॉमा केअर सेंटर येथे ऑक्सिजन ३० बेड होते. त्यावेळी प्रारंभी पुरेसे आरोग्य कर्मचारी मिळत नव्हते. कोरोनाच्या भीतीमुळे काम करण्यास स्वच्छता कर्मचारीसुद्धा तयार नव्हते. तर, ऑक्सिजन सिलिंडर नव्हते. पहिल्या लाटेमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याने आरोग्य विभागाची एवढी फजिती झाली नाही. मात्र, दुसरी लाट मार्च २०२१ मध्ये आली. एप्रिलमध्ये चांदवड तालुक्यातील ११२ गावांपैकी फक्त दोनच गावे कोरोनामुक्त होते. मे महिन्यात दुसरी लाट थोडीशी ओसरली. यात रुग्णसंख्या मोठी होती. इन्फेक्शनचा रेट जास्त होता. आरोग्य यंत्रणा व प्रशासनावर मोठा ताण पडला. यात पुन्हा दुसऱ्यांदा लॉकडाऊन केल्याने रुग्णसंख्या कमी झाली. दुसऱ्या लाटेमध्ये उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा वाढवून ५० बेड कोरोनाचे मिळाले, तर चार व्हेंटिलेटर मिळाले. यासाठी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी पाठपुरावा करून हे ऑक्सिजन बेड मंजूर करून सुरू करून घेतले.यावेळी जम्बो सिलिंडर १७ वरून ३२ मिळाले. तर, पहिल्या लाटेत ऑक्सिजन टाकी नव्हती. दुसऱ्या लाटेत तीन टाक्या मिळाल्या. तर, चांदवड येथे ऑक्सिजन प्लांट सुरू होणार आहे. तज्ज्ञांच्या मते तिसरी लाट लॉकडाऊन उघडल्यानंतर चार ते पाच महिन्यांत येऊ शकते. या लाटेत लहान मुले बाधित होण्याची शक्यता वर्तवली असून चांदवड उपजिल्हा रुग्णालयात पंधरा ते वीस लहान मुलांसाठी ॲडमिट करण्याची सोय केली आहे. बालरोगतज्ज्ञसुद्धा उपलब्ध आहेत.तिसऱ्या लाटेची तयारी चांदवड येथे बऱ्यापैकी केली आहे. आरोग्ययंत्रणा पूर्ण ताकदीनिशी उभी आहे. नवीन आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांची भरती झाली आहे.ग्रामपंचायतस्तरावर विलगीकरण कक्षचांदवड तालुक्यात सद्य:स्थितीत तीन खाजगी कोविड सेंटरना मान्यता मिळाली असून तेथेही सुमारे शंभर बेडची व्यवस्था असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. तर, तिसऱ्या लाटेत आणखी दोन, तीन खाजगी सेंटरना परवानगी मिळेल. तिसऱ्या लाटेसाठी ग्रामपंचायतस्तरावर विलगीकरण कक्ष तयार केले आहे. फक्त विलगीकरणासाठी चांदवडला यायची गरज नाही. गावातच संबंधित उपकेंद्र व आरोग्य कर्मचारी आशा कर्मचारी यांच्यामार्फत तपासणी होणार आहे. उपकेंद्रात डॉक्टर, कर्मचारी कोरोना चाचणीसाठी प्रशिक्षित केले आहे. वडनेरभैरव, काजीसांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रांत लवकरच २० ऑक्सिजन बेडची व्यवस्था होऊ शकते. चांदवड तालुक्यात ३० हजार लसीकरण झाले व लसीकरणासाठी गावनिहाय सत्रांचे आयोजन केले आहे.चांदवडला यंत्रणा सज्जचांदवड येथे तिसरी लाट थोपवण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला असून पहिल्या व दुसऱ्या लाटेत बरेच काही शिकायला मिळाले. त्यामुळे तिसऱ्या लाटेचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने केले जात आहे. दुसऱ्या लाटेचा ग्राफ कमी होत असला तरी लॉकडाऊन उघडल्यामुळे नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर ठेवावे, वारंवार हात धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, लहान मुलांना कोरोनापासून दूर ठेवण्याकरिता सर्वच यंत्रणा सज्ज झाली आहे.- डॉ. सुशीलकुमार शिंदे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, चांदवडपहिल्या लाटेतील स्थितीरुग्णसंख्या - १३५२, बरे झालेली संख्या - १३२२ मृत्युसंख्या - ३०दुसऱ्या लाटेतील एकूण रुग्णसंख्या - ७५४४बरे झालेली संख्या - ७२३३मृत्युसंख्या - १५२.