सिन्नर : ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोक दूध डेअरी व मेडिकल यांच्यासह वेगवेगळी कारणे सांगून वाहनात पेट्रोल भरून बाहेर फिरत आहेत. अशांना आवर घालण्यासह यंत्रणा आठ दिवस आणखी कडक करण्याच्या सूचना आ. माणिकराव कोकाटे यांनी केली. अधिकाऱ्यांनी सिन्नरच्या राजकारणात न पडता आपले समाजकार्य अविरत सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
सिन्नर तहसील कार्यालयात महसूल, आरोग्य, पोलीस व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांची कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेऊन उपाययोजना करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. सिन्नरच्या उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांच्यासह महसूल, पोलीस, आरोग्य व पंचायत समितीच्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
-------------
अधिकाऱ्यांनी राजकारणाकडे लक्ष देऊ नये
सिन्नरच्या राजकारणाकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देऊ नये. माणसे आणि समाज जगविण्यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून काम करावे. माझ्यासह कोणाचाही हस्तक्षेप सहन करून नये. कोणी माझ्या नावाचा वापर करत असल्यास त्याला समज द्यावी. पारदर्शी काम करावे. कोणीही दवाखन्यास राजकारणात आणू नये आणि कोणीही राजकीय रंग देऊ नये, असे आवाहन कोकाटे यांनी केले.
--------------------
ग्रामीण भागातील मृत्यूबाबत चिंता
ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामीण भागात लॉकडाऊन पाळला जात नाही का, असा सवाल उपस्थितीत करीत कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना ग्रामीण भागाकडे लक्ष पुरविण्याच्या सूचना केल्या. ग्रामीण भागात कुटुंबच्या कुटुंब बाधित होत असून एकाच कुटुंबातील अनेकांचा मृत्यू होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली.
---------------
लहान मुलांना धोका
तिसरी लाट उंबरट्यावर असल्याने लहान मुलांना धोका असल्याचे सांगण्यात येते. या तिसऱ्या लाटेची अगोदरच तयारी करण्याच्या सूचना दिली. बैठकीस बालरोगतज्ज्ञांना बोलविण्यात आले होते. त्यांची मतेही बैठकीत जाणून घेण्यात आली. बेड उपलब्धता, घ्यावयाची काळजी याबाबत चर्चा करण्यात आली. बालरोगतज्ज्ञांनी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले.