घोटी - इगतपुरी तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घोटीत प्रांतअधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकारी , लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची बैठक झाली. बैठकीत दर शनिवारी घोटी बंदचा निर्णय घेण्यात आल्याने घोटीकरांनी कडकडीत बंद पाळला. नागरिकांनीही सुरक्षितता बाळगुन करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा ग्रामपालिका व पोलीस प्रशासनाने केली आहे.घोटीत आठवडे बाजाराचा दिवस असूनही ठरल्याप्रमाणे सर्वच दुकानदार व व्यापारी बांधवांनी बंद मध्ये सहभाग घेतला. किराणा दुकाने, भाजीपाला, कपडे व अन्य साहित्याची दुकानही बंद होती. स्थानिक नागरीकांनी या बंदला सकाळपासूनच सकारात्मक प्रतिसाद दिला. बँका, मेडिकल व दवाखाने ही अत्यावश्यक सेवा मात्र सुरळीत सुरू होत्या.उद्या रविवारपासून घोटी शहरात सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंतच दुकाने व बाजारपेठ सुरू ठेवण्यात येणार आहे.या कालावधीतही दुकानदारांनी शासन सूचनांचे पालन करावे, दुकानात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, सोशल डिस्टिंगशनचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा दंडात्मक कारवाई प्रसंगी दुकान सील करण्याच्याही कारवाईला सामोरे जावे लागेल. तसेच विक्रेत्यांनी रस्त्यावर पिवळ्या पट्याच्या आत दुकाने लावावीत. दुकानदारांनी दुकानाबाहेर रस्त्यावर माल लावू नये अन्यथा कारवाई होईल असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.काल प्रांतअधिकारी तेजस चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राणे, पोलीस अधिकारी जालिंदर पळे, सरपंच सचिन गोणके, माजी सरपंच संजय आरोटे यांनी अचानक घोटी बाजारपेठेत भेट देऊन स्वताची दुकाने असतानाही रस्त्यावर माल लावणा?्या दुकानदारांना खडे बोल सुनावले, यापुढे असा बेशिस्तपणा दिसला तर संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस व ग्रामपालिकेला दिल्या.