जायखेडा : कोरोनापासून आपले गाव सुरक्षित राहावे यासाठी जायखेडावासियांनी कंबर कसली आहे. या गावात तीन दिवस संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला, त्यानुसार मेडिकल वगळता इतर सर्व व्यवहार तीन दिवस बंद ठेवण्यात आले आहेत. याचे काटेकोर पालन करण्यात येत असून त्यास ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर जायखेड्यात लॉक डाऊनचे चांगल्या प्रकारे पालन करण्यात येत होते मात्र, किराणा दुकान, भाजीपाला विक्री, पेट्रोलपंप, इतर आवश्यक सुविधा देणारी दुकाने सुरू असल्याने उद्देश सफल होण्यात काहीशा अडचणी येत होत्या. पेट्रोल, भाजीपाला, बाजारहाट व किराणा घेण्याच्या निमित्ताने गावकरी व आजूबाजूच्या गावातील नागरीकांची वर्दळ काही प्रमाणात वाढल्याने अडचणी येत होत्या. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जायखेडा ग्रामपंचायत सरपंच शांताराम अहिरे, उपसरपंच संदेश मोरे व सर्व सदस्यांनी तीन दिवस गाव पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर बाहेरगावच्या व्यक्तींना गावातील प्रवेश बंदी करण्यात आली असून, गावात येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. मेडिकल वगळता गावातील सर्व दुकाने व सेवा तीन दिवस पुर्णत: बंद ठेवण्यात आल्या आहे. सकाळी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना दिवसभर शेतातच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गावात फिरणाºया मोटार सायकलींनाही यामुळे ब्रेक लागला असून, नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. गावातील कोणतीही व्यक्ती सार्वजनिक चौक या ठिकाणी बसलेला किंवा विनाकारण व फिरतांना आढळल्यास संचार बंदीच्या कायद्या नुसार कारवाई करण्याचे संकेत सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी दिले आहे.
जायखेड्यात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 1:43 PM